कशेळे बाजारपेठेत महिलेला लुबाडले

| नेरळ | वार्ताहर |

कर्जत तालुक्यातील कशेळे बाजारपेठत सकाळी आठ वाजता दुचाकीवरून आलेल्या दोघांनी वृध्द महिलेला लुबाडल्याची घटना घडली आहे. महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी हातचलाखी करून लंपास करून दोघे पसार झाले. दरम्यान दुचाकीवरील दोन्ही तरुण सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून कर्जत पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

कशेळे बाजारपेठेत ललित हार्डवेअर नावाचे दुकान आहे. रविवारी 1 ऑक्टोबर रोजी नेहमीप्रमाणे ललित हार्डवेअर हे दुकान 75 वर्षीय चंद्रकांता लक्ष्मीचंद्र गोर यांनी ते उघडले. त्या दुकानात बसल्या असताना तेथे दोन अनोळखी तरूण दुचाकी वरून आले. एकाने दुकानात बसलेल्या चंद्रकांता यांना अकराशे रुपये दिले आणि सदर पैसे हनुमान मंदिरात दान करा असे सांगितले. त्याचसोबत गळ्यातील अडीच तोळ्याची चेन पाच मिनिटे काढून ठेवा असे सांगून ती चेन एका कागदात बांधून त्यांच्या हातात दिली आणि पुडी दहा मिनिटांनी उघडण्यास सांगितले. तरुण दुचाकीवर बसून गेल्यानंतर पाच मिनिटांनी चंद्रकांता यांनी पुडी उघडली असता त्या कागदात सोन्याची चेन नसून दगड असल्याचे त्यांच्या निदर्शनात आले. ललित हर्डवेअरचे मालक ललित गोर यांनी आपल्या दुकानात येवून सर्व माहिती घेवून दुकानातील सीसीटिव्ही कॅमेऱ्यामधील चित्रफीत कर्जत पोलीस ठाणे यांच्या कशेळे आऊट पोस्ट पोलीस ठाणे येथे देऊन रीतसर तक्रार नोंदवली.

Exit mobile version