75 वर्षीय महिलेच्या उपोषणाला कशेळे ग्रामस्थांचा पाठिंबा


|नेरळ | वार्ताहर |

कर्जत तालुक्यातील कशेळे येथील रहिवाशी असलेल्या चंद्रकांता लक्ष्मीचंद गोर या 75 वर्षीय महिला न्यायासाठी आपल्या स्वतःच्या मुला विरोधातच उपोषणाला बसल्या आहेत. 4 जानेवारीपासून गोर यांनी कशेळे येथे उपोषण सुरू केले असून यांचे पती लक्ष्मीचंद दामोदर गोर यांनी सुमारे वीस वर्षापूर्वी जमीन खरेदी केली होती. त्यांनी सदर जमीन मोठ्या मुलाचे नावे करून दोन्ही मुलानी ती समान वाटून घ्यावी असे सुचविले होते. लक्ष्मीचंद्र यांचा 2006 साली मृत्यू झाला. परंतु वडिलांनी दिलेल्या जमिनी पैकी अर्धा वाटा लहान भावास देण्यास तयार असल्याचे वारंवार सांगितले. मात्र प्रत्यक्ष वाटा देण्याच्या वेळी पत्नीने धमकावल्यामुळे आता तो वाटा देण्यास तयार नाही, त्यामुळे आपल्याला संभाळणाऱ्या लहान मुलास त्याचा हक्काची जमीन मिळावी याकरीता 75 वर्षीय चंद्रकांता गोर यांनी गुरुवार 4 जानेवारीपासून उपोषण सुरू केले.

उपोषणस्थळी लावण्यात आलेल्या बॅनरवर आपल्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर त्याची जबाबदारी मुलगा वीरेंद्र आणि सून वैशाली यांची राहील असे नोंद केले आहे. उपोषणकर्त्यां डायबेटिस, ब्लड प्रेशर आणि अनेक आजार आहेत. उपोषणाला कशेळे ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळत असून गावातील बहुसंख्य लोकांनी गोर कुटुंबाची स्थानिक परिस्थिती माहिती असल्याने उपोषणाला बसलेल्या चंद्रकांता यांना पाठिंबा देण्यासाठी हजेरी लावली आहे.

Exit mobile version