कशेळेकरांचा महावितरणवर मोर्चा

वारंवार वीज समस्येबाबत विचारला जाब

| कर्जत | प्रतिनिधी |

कशेळे गावात वीज खंडित होण्याची समस्या सातत्याने भेडसावत आहे. लाईट गेल्यानंतर ती कधी येईल याची चौकशी करण्यासाठी फोन केला तर पॉवर हाऊसचे कर्मचारी किंवा वायरमन फोन उचलत नाहीत. याबाबत कशेळे ग्रामस्थांनी महावितरण कंपनीवर मोर्चा काढला होता.

कशेळेची लाईन पुढे सावळे, वंजारवाडी, पोटल, हुमगाव, मांडवणेपर्यंत गेली आहे. इतक्या लांब लाईनवर अनेक वेळा फॉल्ट होतात. ते रिपेअर करताना कशेळे येथील जीओडी ओपन करून पुढील दुरुस्ती करणे आवश्यक असते, परंतु वायरमन तसे न करता कशेळे गावातील लाईन बंद करतात. यामुळे व्यावसायिकांना खूप अडचणी येतात. उन्हाळ्यात लहान मुले, वृध्द व्यक्तींना याचा त्रास होतो. या समस्येबाबत आपण अनेक वेळा विद्युत कार्यालयात निवेदने दिली. परंतु, महावितरणचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करतात. खासदार सुनील तटकरे दोन वर्षापूर्वी कशेळे येथे आले असता ग्रामस्थांनी त्यांची भेट घेऊन वीज समस्येबाबत निवेदन दिले. त्यांनी त्वरित वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून याबाबत कार्यवाही करून त्याबाबत अहवाल देण्याची सूचना केली होती. परंतु अधिकाऱ्यांनी त्यांच्या सूचनेला केराची टोपली दाखवली.

दरम्यान, संतप्त ग्रामस्थ आणि व्यापाऱ्यांनी शुक्रवार, दि. 21 रोजी सकाळी 11 वाजता कशेळे पॉवर हाऊसवर मोर्चा घेऊन गेले आणि त्यांनी गावातील जे दोन ट्रान्सफॉर्मर काढून नेले ते त्वरित बसवणे आणि इतर सर्व समस्यांबाबत कनिष्ठ अभियंता वैभव सिंग यांना निवेदन दिले. याबाबत पंधरा दिवसांत कार्यवाही झाली नाही तर पॉवर हाऊस येथे उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.

Exit mobile version