पर्यटकांना समुद्रात न जाण्याचे आवाहन
| कोर्लई | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील पर्यटनात प्रसिद्ध असलेला मुरुड तालुक्यातील काशिद बीच पावसाळ्यात दि. 20 जून ते 20 ऑगस्ट दरम्यान दोन महिन्यांसाठी बंद करण्यात आला आहे. स्थानिक प्रशासनाने पर्यटकांच्या सुरक्षिततेचा विचार करुन हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, सुरक्षेचा उपाय म्हणून रस्त्यालगत सूचना फलक व प्लॅस्टिक दोऱ्या लावण्यात आल्या आहेत. पर्यटकांनी सूचनांचे पालन करुन समुद्रात जाऊ नये, असे आवाहन ग्रामपंचायत, ग्रामस्थ, स्टॉलधारक, मुरुड पोलीस निरीक्षक यांच्यावतीने करण्यात आले आहे.
काशिद बीच समुद्रकिनाऱ्यावरील विविध खाद्यपदार्थ, खाद्यपेय स्टॉल्स यंदाही दरवर्षीप्रमाणे पावसाळ्यात बंद ठेवण्यात आले आहेत. पर्यटनात याठिकाणी असलेल्या स्पिडबोट, बनाना बोट, पॅरोसेलिंग बोट मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बंद करण्यात आल्या आहेत, तसेच पावसाळ्यात येथील विविध स्टॉल्स दोन महिन्यांसाठी बंद करण्यात आले आहेत. या कालावधीत येथे सूचना फलकावरील सूचनांचे पालन करुन पर्यटकांनी पोहण्यासाठी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन ग्रामपंचायत, ग्रामस्थ तसेच स्टॉल्सधारकांतर्फे करण्यात आले आहे.







