काशीद बीच हाऊसफुल्ल!

उन्हाच्या काहिलीत पर्यटकांनी लुटला पोहण्याचा आनंद

। कोर्लई । वार्ताहर ।

मुरूड जंजिरा पर्यटनात मे महिन्यात तिसर्‍या विकेंडला मुरूड-बीच व काशिद बीचवर उन्हाच्या काहिलीत पर्यटकांनी समुद्रात पोहोण्याचा मनसोक्त आनंद लुटला. मुरूड बीच व काशीद बीचवर पर्यटकांची मे महिन्याच्या तिसर्‍या विकेंडला गर्दी पाहावयास मिळाली.

शनिवारी याच बीचवर तोबा गर्दी होती. मुरूड बीच व काशीद बीच हे पर्यटनात जगप्रसिद्ध असल्यामुळे या बीचवर पर्यटकांची सातत्याने वाढती वर्दळ असते. शेवटच्या टप्प्यात होणार्‍या मतदानामुळे याचा पर्यटनावर परिणाम दिसून आला. मे महिन्यातील तिसरा विकेंड असल्याने पर्यटकांची गर्दी पहावयास मिळाली. परंतु मुंबईतील पर्यटक कमी प्रमाणात दिसून येत होते. पुणे, सांगली, सातारा, कराड, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, नागपूर, धुळे यवतमाळ अशा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून तसेच महाराष्ट्राच्या बाहेरून व देश विदेशातून पर्यटक मुरूडला भेट देत असतात. मुरूड समुद्रकिनार्‍यावरील रुपेरी वाळू, निळाशार समुद्र, समुद्रामध्ये मध्यभागी असलेला पद्मदुर्ग, मुरूडला असणार्‍या नारळी पोफळीच्या बागा यामुळे पर्यटक मुरूडकडे आकर्षित होत आहे. काशीदबीचवर असणारी रुपेरी वाळू, सुरुची झाडे त्यामुळे पर्यटक काशीद बीचला ही भेट देत आहेत.

Exit mobile version