शनिवार असूनसुद्धा पर्यटक फिरकलेच नाही
| आगरदांडा | प्रतिनिधी |
जगाच्या नकाशावर नावारुपाला आलेल्या मुरुड, काशिद समुद्राकिनारी रोज मुंबई, ठाणे, पुणे आदींसह जिल्ह्यातील शेकडो पर्यटक ये-जा करीत असतात. आज शनिवार असूनसुद्धा पर्यटक न फिरकल्याने येथील सर्व हॉटेल व लॉजिंग व्यवसाय करणारे रिकामे बसून होते. ना वर्दळ, ना गर्दी, त्यामुळे संपूर्ण व्यवसाय ठप्प झाले होते.
मुरुड समुद्रकिनारी असणारे टपरीधारकही पर्यटकांच्या प्रतीक्षेत होते; परंतु ग्राहकच नसल्याने सर्वत्र नाराजीचे वातावरण दिसून येत होते. सर्वत्र शांततेचे वातावरण पहावयास मिळाले. सध्या देशात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक असल्यामुळे पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. निवडणुका संपल्या की पुन्हा पर्यटकांच्या संख्येत वाढ होईल, अशी प्रतिक्रिया टपरीधारक दामू खरगावकर यांनी दिली.