कावळे धनगरवाडी बिबट्याचा धुमाकूळ

दोन गाई फस्त केल्याने शेतकरी हवालदिल

| महाड | प्रतिनिधी |

महाड तालुक्यातील कावळे कुंभार्डे धनगरवाडी येथील शेतकऱ्याच्या दोन गाईंवर बिबट्याने हल्ला केला. त्यात त्या मृत्युमुखी पाडल्याने शेतकरी हवालदिल झाला असून, वनविभागकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

महाड तालुक्यातील विन्हेरे विभागातील कावळे कुंभार्डे धनगर वाडीतील धोंडू कुटेकर या शेतकऱ्याच्या दोन गाईंवर बिबट्याने हल्ला केल्याने त्या मृत्युमुखी पडल्या आहेत. त्यातील एक गाय जवळील रानामध्ये सापडली. तर, दुसऱ्या गाईचा अद्याप पत्ता लागत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. धोंडू कुटेकर यांनी मदतीसाठी महाड वनविभागाचे वनक्षेत्रपाल आशिष पाटील यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला असून, बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. तसेच, बिबट्या परिसरात मुक्तपणे संचार करीत असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले असून, या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी देखील धोंडू कुटेकर यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत वनक्षेत्रपाल आशिष पाटील यांनी सांगितले की, बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या गाईचा पंचनामा केला असून, याबाबतचा मदतीसाठीचा प्रस्ताव रोहा येथील उपवनसंरक्षक कार्यालयाकडे पाठवण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच, या परिसरात फिरणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

Exit mobile version