पर्यटन हंगामापुरता मुख्य रस्त्याचे काम बंद ठेवा

व्यापार्‍यांची मागणी
| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान शहरांतील मुख्य बाजारपेठ भाग असलेल्या महात्मा गांधी रस्त्याचे धुळविरहित रस्त्यात रूपांतर केले जात आहे. मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण कडून क्ले पेव्हर ब्लॉक च हा रस्ता बनविला जात असून मुख्य बाजारपेठेत रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र सध्या पर्यटकांची प्रचंड गर्दी माथेरान शहरात असल्याने प्रशासनाने या रस्त्याचे काम 2 जानेवारी पर्यंत बंद ठेवावे अशी मागणी माथेरान मधील व्यापारी वर्गाने पालिकेकडे केले आहे.

माथेरान शहरात प्रवेश करण्यासाठी महात्मा गांधी रस्ता महत्वाचा समजला जातो.घाट रस्त्याने माथेरानमध्ये येणारा प्रत्येक पर्यटक याच रस्त्याने शहरात येत असतो.सध्या माथेरान मधील रस्त्यावर क्ले पेव्हर ब्लॉक लावून रस्ते धूळ विरहित केले जात आहेत. महात्मा गांधी रस्त्यावर देखील क्ले पेव्हर लावले जात असून या रस्त्याचे मागील काही महिने रखडलेले काम आता सुरू झाले आहे.दिवाडकर हॉटेल येथे अनेक महिने थांबलेले या रस्त्याचे काम सुरू झाले आहे.आता रस्ता मुख्य बाजारपेठेत पोहचला असून एनसी शहा ट्रेडर्स पर्यंत रस्ता क्ले पेव्हर बसवून तयार झाला आहे.त्यात खडीकरण आणि नंतर त्यावर ग्रीड टाकून त्यावर क्ले पेव्हर लावले जात असतात.त्याचवेळी रस्त्याच्या कडेला असलेल्या सांडपाणी वाहून नेणारे गटार या ठिकाणी खड्डे असल्यास ते देखील भरावे लागत असतात.तर संपूर्ण रस्त्याच्या कडेला रेलिंग लावण्यासाठी एक फुटाची भिंत देखील बांधली जात असते.

स्टेशन पासून रिगल नाका पर्यंत पर्यटकांची गर्दी पर्यटन हंगामात असते.त्यात सध्या सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी हजारो पर्यटक माथेरान मध्ये दाखल होत आहेत.त्या बहुसंख्य पर्यटकांची गर्दी मुख्य बाजारपेठेत सतत असते. माथेरान मधील सर्वाधिक रहदारीचा समजला जाणार्‍या या भागात सध्या धूळ विरहित रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे पर्यटकांना रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या क्ले पेव्हर तसेच खडी यांच्या पिशव्या यांचा सामना करावा लागत आहे. एनसी शहा ट्रेडर्स येथे महात्मा गांधी रस्ता आधीच अरुंद आहे आणि त्यात रस्त्याच्या कडेला पेव्हर ब्लॉक यांचे ढीग रचून ठेवले जात आहेत.त्याचवेळी पेव्हर ब्लॉक घेवून येणार्‍या हातगाड्या यांचा देखील त्रास पर्यटकांना होताना दिसत आहे.त्यामुळे माथेरान मधील व्यावसायिक यांच्या दृष्टीने महत्वाचा असलेला हा पर्यटन हंगाम लक्षात घेता माथेरान मधील प्रशासनाने रस्त्याचे सुरू असलेलं काम पर्यटन हंगाम संपेपर्यंत बंद ठेवावे अशी मागणी व्यावसायिक करीत आहेत.

चौकट
पर्यटकांची गैरसोय
रस्त्याच्या कामासाठी आणले जाणारे क्ले पेव्हर तसेच खडी हे साहित्य यांची वाहतूक हा पर्यटन हंगाम पूर्ण होईपर्यंत बंद ठेवावी.तसेच रस्त्याचे काम देखील बंद ठेवावे जेणेकरून पर्यटकांना रस्त्याने चालताना कोणत्याही अडचणी निर्माण होणार नाहीत.पर्यटन हंगाम संपल्यानंतर बाजारपेठ भागातील रस्त्याचे काम सुरू करण्यास सांगावे अशी मागणी माथेरान मधील व्यापारी फेडरेशन कडून करण्यात आली आहे.माथेरान गिरी स्थान नगरपरिषद कडून त्याबाबत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांना तसे आदेश आणि सूचना देण्यात यावी अशी मागणी व्यापारी फेडरेशन कडून माथेरान पालिकेकडे करण्यात आली आहे.

Exit mobile version