| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
नवी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांना कथित दारू घोटाळ्यात गुरुवारी (दि. 21) रात्री अटक करण्यात आली आहे. त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता ईडीकडून दहा दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आली होती आणि ती देण्यात आली आहे. दरम्यान, मी आत असो वा बाहेर, माझे जीवन देशासाठी समर्पित आहे, अशी प्रतिक्रिया केजरीवाल यांनी दिली आहे. केजरीवाल यांचे वकील विवेक जैन यांनी ही बेकायदेशीर अटक आहे, त्यांच्याविरुद्ध कोणताही पुरावा नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, दिल्लीच्या कथित मद्य घोटाळा प्रकरणात ईडीने मुख्यमंत्री केजरीवाल यांना नऊ वेळा समन्स पाठवल्यानंतर काल रात्री अखेर अटक केली आहे. काल 10वा समन्स घेऊन आलेल्या अधिकार्यांनी दोन तास त्यांची चौकशी केली आणि त्यानंतर केजरीवाल यांना अटक करण्यात आली. पदावर असताना अटक झालेले केजरीवाल हे देशातील पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत.
ईडीने केलेल्या या कारवाईचे संपूर्ण देशभरात पडसाद उमटले आहेत. अरविंद केजरीवाल यांच्यावरील कारवाई सूडबुद्धीतून केल्याचा आरोप आपच्या कार्यकर्त्यांसह विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केला आहे. केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आपच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीपासून मुंबईपर्यंत जोरदार आंदोलन केलं आहे. आप कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येऊन आपला निषेध नोंदवला आहे. आपच्या नेत्यांनी आणि मंत्र्यांनीही दिल्लीतील रस्त्यावर येऊन निषेध नोंदवल्याने त्यांची धरपकड करण्यात आली आहे. आपच्या या आंदोलनामुळे दिल्लीतील वातावरण चांगलंच तापलं आहे.