गमतीदार खेळांचा विद्यार्थ्यांनी लुटला आनंद
। माणगाव । प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा परिषद केंद्र उतेखोल तालुका माणगाव या केंद्राचा वार्षिक बाल आनंद मेळावा व विविध कार्यक्रम बुधवारी (दि.25) कुणबी भवन हॉल, निजामपूर रोड माणगाव याठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा झाला. सकाळी 10:30 ते दुपारी 3 यावेळेत या बाल आनंद मेळाव्यात केंद्र उतेखोलमधील 13 शाळांच्या बाल-गोपाळ विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम व गमतीदार खेळांचा विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला.
या मेळाव्याचे उद्घाटन माणगाव येथील प्रसिद्ध उद्योजक विजयशेठ मेथा यांच्याहस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी माणगाव पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सुरेखा तांबट, चारिझेन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कॅप्टन निर्मलसिंग रंधावा, केंद्रप्रमुख शंकर शिंदे, चारिझेन फाउंडेशनचे कार्यकर्ते किशोर झेमसे, माणगाव शिवजयंती उत्सव व रक्तदान शिबीर समितीच्या कार्याध्यक्षा तथा आदर्श शिक्षिका विनया जाधव, परीक्षक शिक्षक सुधा साळवी, योगेश शेलार, केंद्रातील विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग, तालुक्यातील विविध शाळांचे शिक्षक, पालकवर्ग व बाल-गोपाळ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रसिद्ध उद्योजक विजयशेठ मेथा यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देऊन केंद्रप्रमुख शंकर शिंदे व सहकारी यांनी चांगल्याप्रकारे या बाल आनंद मेळावा कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे सांगत अशा कार्यक्रमातूनच विद्यार्थी पुढे जात असल्याचे सांगितले. माणगाव पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सुरेखा तांबट यांनी आपल्या मार्गदर्शनात बोलताना या बाल आनंद मेळाव्याने विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळत असल्याचे सांगितले. केंद्र स्तरावरील अशा स्पर्धांमुळे विद्यार्थी घडत असतात. या स्पर्धातूनच विद्यार्थ्यांना धाडस निर्माण होत असते असे सांगत त्यांनी बाल आनंद मेळाव्याला शुभेच्छा दिल्या.
केंद्रप्रमुख शंकर शिंदे यांनी आपल्या प्रास्ताविकात बोलताना अशा कार्यक्रमासाठी नेहमीच सहकार्य करणारे विजयशेठ मेथा, कॅप्टन निर्मलसिंग रंधावा, माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, माजी उपसरपंच नितीन दसवते यांच्यासह सहकार्य करणाऱ्या सर्वच माणगावकरांचे मनापासून आभार व्यक्त केले. या बाल आनंद मेळाव्यातून विद्यार्थ्यांना कौशल्य प्राप्त होत असते. अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांना थोडासा विरंगुळा व त्यातून पुढे स्पर्धा परीक्षांसाठी आपले विद्यार्थी पुढे जावेत हाच या मेळाव्याचा उद्देश असल्याचे सांगितले. या मेळाव्यात केंद्र उतेखोल शाळेतील राजिप शाळा उतेखोल, विकास कॉलनी, गिरिजनवाडी, बामणोली, जुने माणगाव, खांदाड, कळमजे, नाणोरे, चव्हाणवाडी, खर्डी बुद्रुक, उतेखोलवाडी, उतेखोल आदिवासीवाडी, खर्डी बुद्रुक आदिवासीवाडी या 13 शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन अप्रतिम वेषभूषेसह सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून विविध गमतीशीर खेळांचाही मनमुराद आनंद घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक रमेश उभारे व आदर्श शिक्षिका विनया जाधव यांनी करून केंद्रप्रमुख शंकर शिंदे यांनी सर्व उपस्थित मान्यवर, मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग, पालक यांचे आभार मानले.







