चेंदा मेलम घोषयात्रेने रंगला शहराचा उत्सव
| चणेरा | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील रोहा शहरात केरळातील पारंपरिक आणि प्रसिद्ध असलेली केरळा रहिवाशांची चेंदा मेलम घोषयात्रा मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात संपन्न झाली. ढोल-ताशांच्या गजरात, चेंदा मेलमच्या निनादात आणि पारंपरिक केरळी संस्कृतीच्या सादरीकरणामुळे संपूर्ण रोहा शहर उत्सवमय झाले होते.
ही घोषयात्रा म्हणजे केरळातील समृद्ध संस्कृती, परंपरा आणि वाद्यांचे जतन व संवर्धन करून ती लोकांपुढे सादर करण्याचा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. या रॅलीमध्ये केरळातील पारंपरिक चेंदा, इतर सांस्कृतिक वाद्ये, रंगीबेरंगी पारंपरिक पोशाख तसेच विविध देव-देवतांची हुबेहूब सजीव मांडणी करण्यात आली होती. या अनोख्या सादरीकरणामुळे नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद घेतला.
अय्यप्पा सेवा संगम ट्रस्ट, रोहा यांच्या माध्यमातून गेल्या 27 वर्षांपासून या कार्यक्रमाचे सातत्याने आयोजन करण्यात येत आहे. यावर्षीही ही घोषयात्रा मोठ्या दिमाखात, शिस्तबद्ध आणि मंगलमय वातावरणात पार पडली. या कार्यक्रमामुळे केरळा रहिवाशांमधील एकोपा आणि सांस्कृतिक ओळख अधोरेखित झाली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुनील कुमार, सेक्रेटरी मनोहरन ट्रेसुरे, हरिकुमार दास, पी. एस. चाको यांच्यासह ट्रस्टचे इतर सदस्य, तसेच रोहेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत पुढील वर्षीही अशाच उत्साहात हा कार्यक्रम साजरा व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.






