। सिंधुदुर्ग । प्रतिनिधी ।
मी आमदार आणि मंत्री म्हणून दहा वर्षांत जी कामे केली, ती गेली पंधरा वर्षे आमदार आणि मंत्री म्हणून दीपक केसरकर करू शकले नाहीत. विकासाच्या बाबतीत सावंतवाडी मतदारसंघात त्यांनी भरीव असे कोणतेही काम केलेले नाही. त्यामुळे येणार्या विधानसभा निवडणुकीत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील जनतेने परिवर्तन करावे, असे आवाहन माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
पाच वर्षे राज्यमंत्री आणि अडीच वर्षे कॅबिनेट मंत्री असताना केसरकरांना मंत्री पदाची ताकद कळलेली नाही. त्यामुळे त्यांच्या मंत्रिपदाचा मतदारसंघासाठी आणि जिल्ह्यासाठी काय फायदा, असा प्रश्न करीत केसरकर यांना बदलल्याशिवाय या मतदारसंघाचा विकास होणार नाही, असे स्पष्ट केले. ते म्हणाले, शिक्षणमंत्री म्हणून जिल्ह्यातील बेरोजगारांना ते शिक्षक म्हणून नेमू शकले असते. परंतु, त्यांना कंत्राटीपदाचे गाजर दाखवण्यात आले. डीएड् धारकांवर हा अन्याय आहे. त्याला केसरकर जबाबदार आहेत. आता विधानसभेच्या तोंडावर गणेश मंडळांना पुन्हा बाजा, पेटी वाटण्याचे आमिष केसरकर दाखवत आहेत. मंडळांना पेटी देण्यास आमचा विरोध नाही. मात्र, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ते करीत असलेले राजकारण योग्य नाही.
मल्टिस्पेशलिटी हॉस्पिटल, पंचायत समिती इमारत हे दोन वर्षांपूर्वीच मंजूर झाले होते. मात्र, जागेचा मुद्दा उपस्थित करून मुद्दाम त्यात खो घालण्याचे काम केसरकरांनी केले आहे. दरवाजात असलेल्या एसटी बसस्थानकाचीही तीच परिस्थिती आहे. त्यामुळे एवढी साधी कामे देखील करू न शकलेल्या केसरकारांना जनता आता थारा देणार नाही. केसरकर गाजावाजा करीत असलेले ताज व सिदादी हॉटेल हे दोन प्रकल्प शरद पवार यांनीच आणले होते. मात्र, श्रेयवादासाठी ते पूर्ण होऊ शकले नाहीत. आता सावंतवाडीत पंचतारांकित हॉटेल आणत आहे, असा गाजावाजा करून केसरकर निवडणुकीच्या तोंडावर जनतेची पुन्हा एकदा दिशाभूल करत आहेत.







