| कोर्लई | वार्ताहर |
मुरूड तालुक्यातील तेलवडे गावाच्या जवळील खाजगी क्षेत्रात बेकायदेशीर सोलीव खैर लाकडाची तस्करी होत असल्याची माहिती वनविभागाला बुधवारी (दि. 09) पहाटे अज्ञात व्यक्तीकडून मिळाली होती. माहितीनुसार मुरुड वनवविभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी वर्षा पौळ यांची टिम तेलवडे येथे पोहोचली व आजुबाजूच्या परिसरात पाहणी केली. यावेळी मोठ्या प्रमाणात खैर तोड झाली असल्याचे व झाडाझुडपात ठेवलेली अंदाजे 20 घन मीटर खैर लाकडे (नग) आढळून आली.
वनविभागाचे उपवनसंरक्षक शैलेंद्र कुमार जाधव, सहाय्यक वनसंरक्षक आर.आर.चोबे यांच्या मार्गदर्शनाखाली मुरुड वनपरिक्षेत्र अधिकारी वर्षा पौळ, वनपाल राहुल कुलकर्णी, वनरक्षक विशाल ढोबळे, चेतन चव्हाण यांनी कारवाई करत खैराची लाकडे जप्त केली. जप्त केलेला माल सुडकोली विक्री आगार येथे जमा करण्यात आला असून वनपरिक्षेत्र अधिकारी वर्षा पौळ ह्या पुढील तपास करीत आहेत.
तसेच, वनविभागाच्या क्षेत्रात विनापरवाना बेकायदेशीर होणाऱ्या तस्करीबाबत अवैध वृक्षतोड अथवा मालकी क्षेत्रात विनापरवाना वृक्षतोड होत असल्याचे आढळून आल्यास जबाबदार नागरिकांनी तातडीने वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी वर्षा पौळ यांनी केले आहे.







