10 लाखांचा मुद्देमाल जप्त
| वावोशी | प्रतिनिधी |
खालापूर वनपरिक्षेत्र अंतर्गत परिमंडळ चिलठण, नियतक्षेत्र सांगडे येथील राखीव वनातील मौल्यवान खैर प्रजातीच्या झाडांची बेकायदेशीर तोड व तस्करी करण्याचा प्रयत्न वन विभागाने उधळून लावला आहे. खात्रीशीर माहितीच्या आधारे वनअधिकाऱ्यांनी रात्रभर दबा धरून बसत शुक्रवारी (दि.3) पहाटेच्या सुमारास ही धाडसी कारवाई केली आहे.
या कारवाईत मारुती सुझुकी इको वाहनातून खैरचे तब्बल 40 ओंडके जप्त करण्यात आले. तसेच, वाहनातून लोखंडी रॉड, लाकडी दांडके, हल्ल्यासाठी वापरली जाणारी मिरची पावडरही सापडली आहे. कारवाई दरम्यान आरोपी मात्र अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले असून, त्यांची नावे उघडकीस आली आहेत. यावेळी वन विभागाने एकूण 10 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून त्यात वाहन, मोबाईल व अन्य साहित्यांचा समावेश आहे. ही कारवाई उपवनसंरक्षक राहुल पाटील व सहाय्यक उपवनसंरक्षक सागर माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या तपासादरम्यान राजेंद्र पवार, संजय पगारे, भगवान दळवी, नितीन कांबळे, पांडुरंग गायकवाड, अंकुश केंद्रे, सागर टोकरेकोळी, प्रथमेश देवरे, कैलास कांबळे हे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.







