पोलादपूरमध्ये खैराच्या झाडाची तस्करी रोखली

ट्रकसह खैराचे 430 सोलीव तुकडे जप्त

। पोलादपूर । प्रतिनिधी ।

तालुक्यातील खैरतस्करांवर वनविभागाने पूर्णपणे नियंत्रण मिळविले असताना पोलादपूर येथील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वनउपज तपासणी नाक्यावर चिपळूणच्या दिशेने जाणारा ट्रक 430 खैराचे सोलीव तुकडे घेऊन जाताना जप्त करण्यात आला आहे.

बुधवारी, (दि. 3) रोजी रोहा उपवनसंरक्षक आप्पासाहेब निकत, सहायक वनसंरक्षक रोहा विश्‍वजित जाधव, महाड परिक्षेत्र वनअधिकारी राकेश साहू यांच्या मार्गदर्शनाखाली वनउपज तपासणी नाका-पोलादपूर येथे मुंबई-गोवा महामार्गावरून चिपळूणच्या दिशेने जाणारा ट्रक (क्र.जीजे 17 यूयू 9837) ची तपासणी पोलादपूरच्या स्थानिक वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी केली असता ट्रकमध्ये खैराचे अंदाजे 68 हजार 572 रूपये किमतीचे 430 बिनपासी सोलीव तुकडे असा मुद्देमाल मिळाल्याने ट्रकचालक सिद्दिक अब्दुलरहीम वाढेल, रा. गोधरा, ता. जिल्हा-गोधरा (राज्य गुजरात) व अन्य एक इसमाविरूद्ध कारवाई करून ट्रकदेखील जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या ट्रकची किंमत अंदाजे 7 लाख रूपये आहे. या कारवाईमध्ये पोलादपूर वनपाल बाजीराव पवार, तपासणी नाका वनरक्षक नवनाथ मेटकरी, वनरक्षक पोलादपूर संदीप परदेशी, तपासणी नाका पोलादपूरचे वनरक्षक सचिन मेने, निलेश नाईकवाडे, प्रियांका जाधव, अमोल रोकडे हे सामील होते.

Exit mobile version