। रोहा । वातार्र्हर ।
रोहा तालुक्यातील खांब-पालदाड अंतर्गत देवकान्हे ते खांब हा नवीन रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र अवघ्या चार महिन्यांत धानकान्हे येथे रस्ता खचला असल्याने कामाच्या दर्जाबाबत स्थानिकांकडून प्रश्न उपस्थित होत आहे.
खांब-पालदाड येथील दैनंदिन प्रवासी व वाहनचालक तसेच स्थानिकांच्या पाठपुराव्याने मार्चमध्ये या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. परंतु पहिल्याच पावसात धानकान्हे गावाच्या प्रवेशद्वाराजवळ रस्त्याचा काही भाग खचल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. या मार्गावर कायम रहदारी असते. त्यात अरुंद असल्याने वाहने समोरासमोर आल्यास अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित प्रशासनाने खचलेल्या रस्त्याची लवकरात लवकर डागडुजी करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात आली आहे.