पक्ष विरोधी कार्यवाही केल्याचा ठपका
| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात ऐन निवडणूक रणधुमाळी सुरू असताना पक्षविरोधी कार्यवाही केल्याचा ठपका ठेवत नासिकेत कावजी यांची शेतकरी कामगार पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. खंडाळे येथील शेकाप कार्यकर्त्यांच्या ठाम मागणीनुसार हा निर्णय शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी रविवारी (दि.1) जाहीर केला.
यावेळी शेकापचे जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील, प्रफुल्ल पाटील, प्रमोद घासे, विलास वालेकर, नरेश गोंधळी, संतोष गुरव, नामदेव पाटील, प्रणय भगत, सागर गुरव, संदेश पाटील, स्वप्नील पाटील, रुपेश पाटील, विजय थळे, विलास थळे, भरत मानकोले, एकनाथ मुळूसकर, नवीन वेळे, रविंद्र नाईक, सिध्दार्थ गोंधळी, लिलाधर गोंधळी, सूनील घरत, निवास घरत, उदय वेळे, सुरेंद्र वेळे, रविंद्र पाटील, नैनेश राऊत, अशोक बाणे, सुरज राऊत आदी शेकापचे पदाधिकारी, खंडाळे व संगम येथील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना, नासिकेत कावजी यांनी पक्षाच्या अधिकृत भूमिकेला छेद देणारी कार्यवाही केल्याचे खंडाळे येथील शेकाप कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आले. या प्रकारामुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. या पार्श्वभूमीवर संतप्त कार्यकर्त्यांनी थेट शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांची भेट घेतली. जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी भवन येथील सभागृहात बैठक घेण्यात आली. बैठकीत खंडाळे येथील कार्यकर्त्यांनी कावजी यांच्या पक्षविरोधी भूमिकेचा तीव्र शब्दांत निषेध करत तत्काळ हकालपट्टीची मागणी लावून धरली. कार्यकर्त्यांच्या मागणीची दखल घेत जयंत पाटील यांनी कोणतीही दिरंगाई न करता नासिकेत कावजी यांची शेतकरी कामगार पक्षातून हकालपट्टी जाहीर केली. या निर्णयामुळे पक्षशिस्तीचा ठाम संदेश गेला असून, शेकाप कार्यकर्त्यांनी समाधान व आनंद व्यक्त केला आहे.






