महाशिवरात्री जत्रेनंतर खांदेश्वर परिसर कचरामय

पालिकेच्या धडाकेबाज कारवाईत तासाभरात स्वच्छता

| पनवेल | प्रतिनिधी |

महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर खांदा वसाहतीतील खांदेश्वर मंदिर येथे भरलेल्या जत्रेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. विविध व्यापाऱ्यांनी स्टॉल्स उभारल्याने परिसरात मोठी उलाढाल झाली. मात्र, जत्रा आटोपल्यानंतर मंदिर परिसर, रस्ते व गार्डनमध्ये मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक व इतर कचरा साचला. यामुळे संपूर्ण भाग अस्वच्छ झाला होता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पनवेल महानगर पालिका प्रशासनाने तातडीने स्वच्छता मोहीम राबवली. स्वच्छ आरोग्य अधिकारी अरुण कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली 50हून अधिक स्वच्छता दूतांनी पहाटेपासून काम सुरू केले. पाच ते सहा घंटागाड्या व दोन मोठ्या ट्रकच्या सहाय्याने तब्बल 25 टन कचरा गोळा करून डम्पिंग ग्राउंडवर हलविण्यात आला. अवघ्या एका तासात संपूर्ण परिसर पुन्हा स्वच्छ करण्यात यश आले. पालिकेच्या या तत्परतेचे नागरिकांकडून कौतुक होत असून, भविष्यात जत्रेनंतर स्वच्छता राखण्यासाठी नागरिकांनीही जबाबदारी घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Exit mobile version