विरोधकांनी मताधिक्य घेऊन दाखवावे

बाबूशेठ खानविलकरांचा इशारा

। माणगाव । प्रतिनिधी ।

महाड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक 20 नोव्हेंबर रोजी होत असून या निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीचे शिंदे गटाचे उमेदवार आ.भरत गोगावले यांच्या प्रचारार्थ निजामपूर येथे शुक्रवारी (दि.15) खा. सुनील तटकरे यांच्या उपस्थित जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत उमेदवार भरत गोगावले व त्यांचे पुत्र विकास गोगावले यांनी बाबूशेठ खानविलकर यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले होते. या टीकेचा खरपूस समाचार घेण्यासाठी शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे कार्यकर्ते बाबूशेठ खानविलकर यांनी शनिवारी (दि.16) सायंकाळी माणगाव तालुक्यातील निजामपूर विभागातील भाले गावातील आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांना ठणकावून सांगितले.

यावेळी बोलताना बाबूशेठ खानविलकर म्हणाले कि, निजामपूरात शुक्रवारी शिंदे गटाची सभा झाली. या सभेला बाहेरून जास्त जनता आली होती. अनेक लोकांना 150 रुपये देऊन बोलावण्यात आले होते. या निजामपूर विभागातील सुज्ञ जनता हि माझ्याबरोबर असून विरोधकांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय गप्प बसणार नाही. सभेत विकासशेठ माझ्याबद्दल जे बोलले त्यांना माझे एवढेच आव्हान आहे कि, तुम्ही माझा काही वाकडे करू शकत नाही. तसेच, या सभेत पोलादपूरचे आमचे मित्र आले होते, ते काहीतरी बरगळत होते. माझे त्यांना आव्हान आहे कि, निजामपूरला तुम्ही मताधिक्य घेण्याची भाष्य बोलता ते मताधिक्य या विभागातून घेऊन दाखवा, मी राजकारण सोडून देईन, अशा इशारा खानविलकर यांनी विरोधकांना दिला आहे.

Exit mobile version