250 गावकर्यांनी एकत्रित येत केली भातझोडणी
| मुरुड जंजिरा | सुधीर नाझरे |
कोकणातील रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुका हा निसर्गाने भरभरुन सौंदर्य लाभलेला तालुका आहे. तालुक्यातील खारआंबोळी हे जवळपास 250 लोकवस्तीचे गाव आहे. येथील कुटुंबे आजही गुण्यागोविंदाने नांदतात. याचा प्रत्यय नुकताच आला. घरटी एका पुरुषाने एकत्र येत भाताची सामुदायिक झोडणी केली. एकीकडे शेतीसाठी मजुरांची वानवा असताना, दुसरीकडे खारआंबोळी गावाने ‘गाव करील ते राव काय करील’ या उक्तीतून मजुरांच्या समस्येवर मात करीत झोडणीचे काम पूर्ण केले. गावाचा आदर्श अन्य गावांनी घेतल्यास शेतीचे कामे पूर्णत्वास जाण्यास अडचण येणार नसून, याबाबत गावाचे कौतुक होत आहे.
रायगडमधील मुरुड तालुक्यात खारआंबोळी गावात 250 गावकर्यांनी देवळासमोरील शेतीत जुलै महिन्यात भातलावणी केली होती. आज भाताची सामुदायिक झोडणी करून 100 किलोची 92 पोती भात समाजासाठी जमा केले, अशी माहिती माजी सरपंच मनोज कमाने यांनी दिली. गावागावातील मतभेद विसरून गावच्या शेतात हाक दिल्याबरोबर पुरुष सकाळी सात वाजल्यापासून कामाला येतात. झोडणी काम लवकर व्हावे म्हणून पारंपरिक पद्धत आजही वापरतात. कोणत्याही मशीनचा वापर करत नाही. गावातील मंडळी कुशल कामगार असल्याने बाहेर दिवसाला एक हजार मजुरी घेणारेदेखील गावच्या झोडणीच्या कामाला स्वतःहून हजर राहतात. आपापसातील मतभेद विसरून आनंदात माणुसकीची मूल्य जपून कामात सहभागी होतात, असेही कमाने यांनी सांगितले. अशी परंपरा कोठे पाहायला मिळत नाही, त्यासाठी हे गाव प्रसिद्ध आहे, असे कमाने म्हणाले.
मजुरीने माणसे घेऊन शेतीची कामे जोरकसपणे सुरू आहेत. पावसाचा अनियमितपणा असला तरी आता पावसामुळे शेतजमिनीत ओसाड होऊ देत नाही. पावसाची अजूनही गरज असून, त्यावरच भातशेतीची मदार आहे. तालुक्यात तीन हजार हेक्टर जमिनीवर भातशेती केली जाते. भातपीक हे मुख्य पीक आहे. खारआंबोळी गावची शेती सर्वात शेवट लावतात. करण अनेक ठिकाणी अतिपावसाने गावकर्यांचे राब वाहवून जातात. त्यामुळे गावची शेती लावून झाल्यावर उरलेले राब गावकर्यांना देण्यात येतात. असा सार्वजनिक हिताचा विचार हा गाव जपतो. या गावची लावणी पाहण्यासाठी छयाचित्रकार व पर्यटकदेखील आवर्जून भेट देतात.
गावातील अनेक मंडळी कुशल कामगार आहेत. परंतु, बाहेर दिवसाला एक हजार रुपये मजुरी घेणारेदेखील गावच्या झोडणीच्या कामाला स्वतःहून हजर राहतात. आपापसातील मतभेद विसरून आनंदात माणुसकीची मूल्य जपून कामात सहभागी होतात. अशी परंपरा कोठेही पाहायला मिळत नाही, त्यासाठी हे गाव प्रसिद्ध आहे.
मनोज कमाने,
माजी सरपंच
