| नाशिक | प्रतिनिधी |
भोंदूगिरीतून अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या अशोक खरातच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. खरातला न्यायालयाने 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिली. अशोक खरात याची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी पुन्हा एकदा कोठडी वाढवून देण्याची मागणी केली होती. महिलांवरील अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या खरातचा तपास करण्यासाठी एसआयटीला अधिक कालावधीची गरज असल्याचे न्यायालयाने मान्य केले आहे. अशोक खरात याला रविवारी सकाळी 11.30 वाजता कोर्टात आणण्यात आले. न्यायमूर्ती श्रीमती एम. व्ही. भराडे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी एसआयटीचे तपासी अधिकारी किरण सूर्यवंशी आणि सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी खरातच्या तीन दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. यावेळी सरकारी पक्षाने युक्तिवाद करताना सांगितले की, आरोपी हा तपासात सहकार्य करत नाही. त्याने मोबाईलमध्ये अनेक नावे डमी किंवा कोडवर्ड मध्ये सेव्ह केली असण्याची शक्यता आहे, यामध्ये काही राजकीय व्यक्तींचाही समावेश असू शकतो. तसेच, पीडित महिलांना तो जे द्रव्य किंवा पाणी पाजत होता, त्याबाबतही सखोल तपास करायचा आहे, असेही त्यांनी सांगितले.
खरातच्या पोलीस कोठडीत वाढ
