| पनवेल | वार्ताहर |
वाढत्या वाहनांमुळे खारघर वसाहत वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडली आहे. वाहतूक पोलीस वाहतूक कोंडी सोडविण्याऐवजी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करून दंड वसूल करण्यावर भर देत असल्यामुळे रहिवाशांमध्ये नाराजी पसरली आहे.
खारघर परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नवी मुंबई वाहतूक विभागाने 15 वर्षांपूर्वी खारघरमधील हिरानंदानी पुलाखाली वाहतूक कार्यालय सुरु करण्यात आले. प्रामुख्याने नवरंग सर्कलकडून गोखले शाळेमार्गे शिल्प चौककडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक विभागाने सम-विषम पार्किंग सुरु केली. नियमांचे उलंघन करणार्यावर कारवाई करणे आवश्यक होते. मात्र, वाहतूक पोलिसांनी त्याकडे डोळेझाक केल्यामुळे होणाऱ्या कोंडीच्या त्रासामुळे सदर रस्त्यावरुन धावणाऱ्या बेस्ट आणि एनएमएमटी प्रशासनाला बसेस बंद कराव्या लागल्या.
विशेषतः सायंकाळी पाच नंतर खरेदीसाठी घराबाहेर पडणारा दुचाकी, चार चाकी वाहन चालक रस्त्यावर मिळेल, त्या ठिकाणी उभी करीत असल्यामुळे बँक ऑफ इंडियाकडून शिव मंदिरकडे जाणाऱ्या मेट्रो मार्ग, नवरंग सर्कलकडून गोखले शाळा मार्गे शिल्प चौककडे जाणाऱ्या रस्त्यावर आणि सेक्टर-13 शिल्प चौक शेजारी असेलल्या डेली बाजार चौक समोरील आणि शिल्प चौक समोरील रस्त्याचा दोन्ही बाजुला विविध दुकाने आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स आहेत. सायंकाळी पाच नंतर वाहतूक पोलीस वाहतूक कोंडी सोडविण्याऐवजी दंडांत्मक कारवाई करुन वरिष्ठांकडून शाबासकी मिळविण्यात व्यस्त असल्यामुळे खारघरची वाहतूक कोंडीतून सुटका कशी होणार? असा प्रश्न खारघरवासियांना पडला आहे.
‘सिडको’ने खारघर, सेक्टर-12, 13, 20 आणि 21 कडे जाणाऱ्या रस्त्याच्या मध्यभागी शिल्प चौक उभारले आहे. सेक्टर-12 कडे जाणाऱ्या रस्त्याचा कडेला द पॅसिपिक कमर्शियल इमारत आहे. इमारतीच्या तळमजल्यावर खाद्य पदार्थ, दुकान, मोबाईल शॉप, रुग्णालय तसेच काही कार्यालये आहेत. दुसरीकडे बँका आणि विविध बँकेचे एटीएम, टुर्सच्या गाड्या, बस आणि रिक्षा थांबा आहे. त्यात दुकानातील व्यापारी, दुकानदार तसेच खरेदीसाठी येणारे ग्राहक रस्त्यावरच वाहने उभी करतात. त्यामुळे सकाळ-संध्याकाळ वाहतूक कोंडी होत असते विशेषतः सदर रस्ता अरुंद आहेत. त्यामुळे शिल्पचौक
वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडला आहे.






