खारघरकर तापाने फणफणले

। नवीन पनवेल । वार्ताहर ।

खारघरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्यानंतर आता साथीच्या आजाराने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. शहरात स्वाईन फ्लू, मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून ऑगस्ट महिन्यात साथीच्या आजाराचे पन्नासहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत.

खारघर वसाहतीत मोठे रस्ते, पदपथ तसेच अनेक ठिकाणी हायमास्ट दिव्यांमुळे खारघर सुंदर शहर म्हणून दिसत असले तरी आजही अनेक भागांत कचर्‍याचे ढीग, मलनिस्सारण वाहिन्यांच्या विविध समस्या आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यांवर दुर्गंधीयुक्त पाणी वाहत असून पावसाळ्यापूर्वी वसाहतीमधील गटारांची साफसफाई केली गेली नसल्यामुळे अजूनही काही भागांत पाणी तुंबण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे शहरात डासांची उत्पत्ती वाढल्याने हिवताप, मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांत झपाट्याने वाढ होत आहे. जुलै महिन्यात खारघरमध्ये स्वाईन फ्लूचा एक, डेंग्यूचे चार आणि मलेरियाचे आठ रुग्ण आढळून आले होते; तर ऑगस्ट महिन्यात हीच संख्या अनुक्रमे तेरा, अठ्ठावीस आणि बारा झाली आहे. गाव परिसर आणि वसाहतीमध्ये सध्या रुग्णवाढ होत आहे. खासगी रुग्णालयांतदेखील ताप, हिवताप आणि डेंग्यूचे रुग्ण मोठ्या संख्येने येत आहेत. याबाबत पालिकेच्या आरोग्य विभागाकडे विचारणा केली असता त्यांनी धुरीकरण आणि फवारणी नियमितपणे केली जात असल्याचे सांगितले.

मलनिःसारण वाहिन्याची स्वचछता करा
खारघर सेक्टर सहा, बारा, अकरा आणि एकवीसमधून नाले वाहत आहेत. नाल्यात अनेक ठिकाणी पाणी तुंबल्यामुळे, तसेच गटारांची योग्य प्रकारे साफसफाई झाली नसल्यामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे सिडको आणि पालिकेच्या माध्यमातून मलनिःसारण वाहिन्यांची स्वच्छता करण्याची मागणी परिसरातील रहिवासी करीत आहेत.

Exit mobile version