खारलँडचा सावळागोंधळ; पंडित पाटील यांचा आरोप

| अलिबाग | प्रतिनिधी |

खाडी, समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या गावांसाठी खारेपाटातील मानकुळे खारलँड योजना महत्त्वपूर्ण आहे. निधी असतानादेखीलही पाच वर्षांत ही योजना पूर्ण करण्यास खारलँड विभाग अपयशी ठरले आहे. सावळागोंधळामुळे गावांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याचा आरोप माजी आ. पंडित पाटील यांनी केला आहे.

खाडी, समुद्रकिनारी राहणाऱ्या गावांबरोबरच भातशेतीला उधाणाचा धोका कायमच राहिला आहे. उधाणामुळे हजारो हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. भातशेती नष्ट होऊ लागली आहे. शेतीबरोबरच गावांचे पुनर्वसन करण्याची वेळ आली आहे. गावांतील शेतीबरोबरच गावांच्या सुरक्षेसाठी शेकापचे नेते माजी आ. पंडित पाटील यांनी अलिबाग तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाची असणारी मानकुळे बहिरीचापाडा ही योजना मंजूर केली होती. त्यासाठी 11 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. मात्र, खारलँड विभागाने सहा कोटींची निविदा काढली होती. त्यामध्ये रॉयल्टी आणि जीएसटीचा समावेश करणे गरजेचे असताना संबंधित यंत्रणेने त्याचा समावेश केला नाही. जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या योजनेचे काम पाच वर्षांत पूर्ण करणे आवश्यक असताना, संबंधित यंत्रणेला निधी खर्च करता आला नाही. ज्या ठेकेदाराला सहा कोटी रुपयांचे काम दिले, त्याने ते काम पूर्ण न केल्याने ते स्थगित करण्यात आले. अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. काम वेळेत पूर्ण न झाल्याने त्याचे सुधारित अंदाजपत्रक 22 कोटींवर पोहोचले आहे.

खारलँड विभाग जनतेच्या जीवाशी का खेळत आहेत? निधी मंजूर व पैसे असतानादेखील काम करण्यास दिरंगाई का, असा संतप्त सवाल पंडित पाटील यांनी उपस्थित केला आहे. नव्याने निविदा न काढल्याने जुने काम अडचणीत येण्याची भीती पंडित पाटील यांनी व्यक्त केली आहे.

खारेपाटातील महत्त्वपूर्ण योजना कोणाच्या दबावाखाली अडकली आहे, याचा खुलासा प्रशासनाने करावा. या कामात अनियमितता झाल्याने संबंधित कार्यकारी अभियंता रजेवर गेले आहेत. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यालगतची महत्त्वाची असणारी मानकुळे-खारलँड योजना कधी पूर्ण होणार?

पंडित पाटील, शेकाप नेते
Exit mobile version