भवानीपूरमध्ये ‘खेला होबे’

पोटनिवडणुकीत ममतादीदी विजयी
मुख्यमंत्रीपद राखलं !
कोलकाता | वृत्तसंस्था |
पश्‍चिम बंगालमधील भोवानीपूर पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जी विजयी झाल्या आहेत. पश्‍चिम बंगालच्या महत्त्वाच्या अशा भवानीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी 30 सप्टेंबर रोजी मतदान पार पडल्यानंतर, सर्वांच्या नजरा आज सकाळी आठ वाजेपासून सुरू असलेल्या मतमोजणीकडे लागले होते. ममता बॅनर्जी यांनी या पोटनिवडणुकीत भाजपाच्या प्रियंका टिबरेवाल यांचा 58 हजारांपेक्षा अधिक मतांनी पराभव केला.
पश्‍चिम बंगालचं मुख्यमंत्रीपद स्वतःकडे कायम राखण्यासाठी ममता बॅनर्जींना हा विजय आवश्यक होता. कारण, मे महिन्यात नंदीग्राम मतदार संघात झालेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झालेला होता. पश्‍चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत टीएमसीने एकहाती सत्ता आणलेली जरी असली, तरी देखील ममता बॅनर्जी या स्वतः निवडणुकीत पराभूत झाल्या होत्या. त्यामुळे त्यांना कायदेशीरदृष्ट्या निवडून येणं गरजेचं होतं.

बंगालमध्ये निवडणुका सुरू झाल्यापासून केंद्र सरकारने आम्हाला सत्तेवरून हटवण्यासाठी कट रचले. आपण निवडणूक लढवू नये कारस्थान केले त्यात आपल्या पायाला दुखापत झाली. मात्र 6 महिन्यांच्या आत निवडणुका आयोजित केल्याबद्दल निवडणुक आयोगाला तसेच मतदान केल्याबद्दल आपण जनतेचे आभारी आहोत.
ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री

Exit mobile version