दिल्लीत ‌‘खेलो इंडिया पॅरा गेम्स’ स्पर्धा

| कोल्हापूर | वृत्तसंस्था |

यंदा प्रथमच होत असलेल्या ‌‘खेलो इंडिया पॅरा गेम्स’मधून पॅरा खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळणार आहे. राष्ट्रीय स्तरावर विविध क्रीडा प्रकारांत पॅरा-ॲथलेट स्पर्धा होत आहे. येत्या डिसेंबरमध्ये सात क्रीडा प्रकारांत स्पर्धा रंगणार असून, पॅरा खेळाडूंत त्याची उत्सुकता आहे. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू व इंदिरा गांधी स्टेडियमसह डॉ. कर्णीसिंग शुटिंग रेंजवर स्पर्धा होणार आहेत.
केंद्रीय क्रीडा मंत्रालय, स्पोर्टस ॲथोरिटी ऑफ इंडिया, नॅशनल स्पोर्टस फेडरेशन, पॅरालिंपिक कमिटी ऑफ इंडिया, सेरेबल पाल्सी स्पोर्टस फेडरेशन ऑफ इंडियाच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा होत आहे. ‌‘खेलो इंडिया’ स्पर्धेप्रमाणे पॅरा खेळाडूंमधून उत्कृष्ट खेळाडू शोधता यावेत, त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचा अनुभव मिळावा, क्रीडा करियरवर त्यांनी लक्ष केंद्रीत करावे, हा यामागचा हेतू आहे.

पॅरा आशियाई , पॅरा कॉमनवेल्थ, पॅरालिंपिक स्पर्धेमध्ये सहभागी झाल्यानंतर खेळाडूंचा कस लागतो. अनेक आव्हानांचा सामना करत त्यांना पदके मिळवावी लागतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध देशांच्या खेळाडूंच्या तुलनेत त्यांचा अनुभव तोकडा पडतो. त्यावर इलाज म्हणून पॅरा खेळाडूंना ही राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेची भेट क्रीडा मंत्रालयाने दिली आहे. देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांत पॅरा खेळाडूंकडून खूप अपेक्षा आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने यंदा सात क्रीडा प्रकार निवडण्यात आले आहेत. त्यांच्या येण्या-जाण्यासह जेवण, निवासाचा खर्च केला जाणार आहे. विजेत्यांना पाच लाख रूपये शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

असे असणार क्रीडा प्रकार
धनुर्विद्या, ॲथलेटिक्स, बॅडमिंटन, सीपी-फुटबॉल, शुटिंग, टेबल-टेनिस, पॉवरलिफ्टिंग

Exit mobile version