खेलो इंडिया युवा स्पर्धा 2024

महाराष्ट्राचे पदकांचे शतक

| चेन्नई | वृत्तसंस्था |

खेलो इंडिया युवा स्पर्धा 2024 मध्ये महाराष्ट्राने पदकांचे शतक साजरे करण्याचा पहिला मान पटकावला. महाराष्ट्राची नेमबाज ईशा टाकसाळेने 10 मीटर एअर रायफलच्या अंतिम फेरीत निर्विवाद वर्चस्व गाजवताना सुवर्णवेध घेतला. त्यामुळे खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंचा दबदबा दिसतोय. तर तेलंगणाच्या वृत्ती अग्रवालने जलतरणातील तिचे तिसरे सुवर्ण नावावर केले.

महाराष्ट्राच्या खात्यात 37 सुवर्ण, 32 रौप्या आणि 40 कांस्य अशी एकूण 109 पदकं जमा झाली आहेत. दुसर्‍या क्रमांकावर असलेला तामिळनाडू अजून भरपूर दूर आहे. मुलींच्या रोड सायकलिंग 100 मीटर बॅकस्ट्रोक आणि मुलांच्या व्हॉलीबॉलमध्ये सुवर्णपदक जिंकल्यामुळे तमिळनाडू हरियाणापेक्षा पुढे राहिले आहेत. त्यांच्याकडे आता 29 सुवर्ण, 18 रौप्य आणि 30 कांस्य अशी एकूण 77 पदके आहेत. हरयाणाला राजरथिनम स्टेडियमवरील कुस्ती आखाड्यातून पाचपैकी फक्त दोन सुवर्णपदके जिंकता आली आणि आता 29 सुवर्ण, 15 रौप्य आणि 39 कांस्यांसह एकूण 83 पदके त्यांच्या नावावर आहेत.

जलतरणात सुवर्ण कामगिरी
महाराष्ट्राला जलतरणात दोन सुवर्णपदक मिळाली. अदिती हेगडेने 100 मीटर बटरफ्लाय स्पर्धेत आणि मुलींच्या 4 बाय 100 मीटर रिले संघाने सुवर्णपदक जिंकले. रिलेमध्ये अव्वल ठरलेल्या कर्नाटकच्या जलतरणपटूंपैकी एकाने लवकर पाण्यात उडी घेतल्याने त्यांना अपात्र ठरवण्यात आले आणि त्यामुळे महाराष्ट्राचे सुवर्णपदक पक्के झाले. वेटलिफ्टर साईराज परदेशी ( मुले 81 किलो) आणि कुस्तीपटू सुमित कुमार ( मुले 71 किलो फ्रीस्टाइल) यांनी दोन सुवर्णपदक जिंकून महाराष्ट्राच्या खात्यात आणखी पदकं जमा केले.
Exit mobile version