शेकडो कार्यकर्ते शेकापमध्ये दाखल
| मुरुड जंजिरा | वार्ताहर |
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम जोरदार सुरू आहे. एकीकडे प्रचाराचा थोफा थंडावल्या असतानाच, दुसरीकडे मात्र शिवसेना शिंदे गटाला मोठे खिंडार पडले आहे. स्व. कृष्णा बाळोजी गिदी यांच्या जयंतीचे औचित्य साधून सोमवारी (दि. 18) राजपुरी येथील वरची वसाहत शिवसेना शिंदे गटातील शेकडो कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून स्व. कृष्णा बाळोजी गिदी यांच्या निवासस्थानी जाहीर पक्षप्रवेश केला.
यावेळी शेकापचे ज्येष्ठ नेते तथा रायगड जिल्हा मच्छिमार संघाचे अध्यक्ष मनोहर बैले, महाराष्ट्र मच्छिमार संघाचे अध्यक्ष विजय गिदी, तुकाराम पाटील, श्रीकांत वारगे, राजपुरी सरपंच सुप्रिया गिदी, अण्णा पाडगे, माजी सरपंच हिरकणी गिदी, सदस्य ग्रुप ग्रामपंचायत राजपुरी महेंद्र आंबटकर, राजपुरी गावचे अन्नदाते दामोदर बाणकोटकर आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, पक्ष प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांच्या उपस्थित मान्यवरांनी जोरदार स्वागत केले. तसेच पक्षात सर्वांना सन्मानाची वागणूक दिली जाईल, अशी ग्वाही दिली. यावेळी प्रवेशकर्त्यांनी अलिबाग-मुरुड-रोहा विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार चित्रलेखा नृपाल उर्फ चिऊताई यांना निवडून आणणारच, असा निर्धार केला.