रस्त्यावर खड्डेच खड्डे, निवारा शेड बनलंय घाणीचं आगार
| खोपोली | प्रतिनिधी |
खोपोली नगरपरिषदेने स्वतःची बस सेवा बंद करून तिचे खासगीकरण केल्यानंतर बसस्थानकाच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे प्रवासी निवारा शेडमध्ये घाणीचे साम्राज्य झाले आहे, तसेच बसस्थानकात डांबरीकरणाचा अंश नसलेले प्रवाशांना ताटकळत बाहेर धूळखात थांबावे लागत आहे. त्यामुळे परिवहन सेवेचे तीनतेरा वाजले असून, प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
खोपोली सिटीबस स्थानकात स्थानिक आणि बाहेरगावी जाणार्या प्रवाशांना बसण्यासाठी माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या खासदार निधीतून आणि रोटरी क्लब आणि खोपोली नगरपालिकेच्या प्रयत्नातून प्रवासी निवास शेड बांधण्यात आली आहे. सध्या हा थांबा चारही बाजूनी लॉकआऊट केलेला म्हणजे बंदिस्त आहे. दररोज हजारो प्रवासी या थांब्याच्या आजूबाजूला आडोसा घेऊन उभे राहात आहेत. कोणी झाडाखाली उभे, कोणी या थांब्याच्या पत्र्याच्या पागोळीच्या ओसरीला भरपावसातही तासन्तास उभे राहून गरोदर, वयस्कर महिलांना बस गाड्यांची वाट बघावा लागत आहे.