खोपटा नव नगर विकास आराखडा तयार

। पनवेल । वार्ताहर ।
महाराष्ट्र शासनाने खोपटा नव नगर अधिसूचित 32 गावांचा समावेश असलेल्या क्षेत्रासाठी सिडकोची विशेष नियोजन प्राधिकरण नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार, सिडकोने सर्वसमावेशक व उत्तम दर्जाच्या सोयी व सुविधांनी परिपुर्ण विकास करण्यासाठी खोपटा नव नगर क्षेत्राचा विकास आराखडा तयार करण्याच्या इराद्याची सूचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
खोपटा नवनगर अधिसुचित क्षेत्राच्या विकासाचे उद्दिष्ट पायाभूत आणि सामाजिक सुविधा प्रदान करणे व विकासाच्या विविध क्षेत्रात संधी निर्माण करणे आहे. एकात्मिक प्रोत्साहनार्थ विकास नियंत्रण नियमावलीनुसार खोपटा क्षेत्रातील 6 गावांचा मंजूर विकास आराखडा तसेच उर्वरित 26 गावांचा विकास आराखडा परस्पर सुसंगत असावा, यासाठी 26 गावांचा विकास आराखडा तयार करत असतांना 6 गावांच्या मंजूर असलेल्या विकास आराखड्याची फेरतपासणी करुन त्यात बदल करण्यात येणार आहे.
खोपटा अधिसूचित क्षेत्राचा विकास आराखड्याचे नियोजन करण्याकरिता सर्व ग्रामपंचायतींना त्यांच्या गावांची आवश्यक अद्यावत माहिती पुरविण्याची विनंती करण्यात आलेली आहे, जेणेकरुन विकास आराखड्याचे नियोजन त्या अनुषंगाने तयार करता येईल. शहराचा विकास आराखडा तयार करतांना अस्तित्वातील असलेल्या गावांची वाढ लक्षात घेऊनच नियोजन करण्यात येईल.

Exit mobile version