उद्घाटनाआधीच जेट्टीचे स्लॅप फुटले; शासनाच्या करोडो रुपयांचा चुराडा
| मुरुड-जंजिरा | प्रतिनिधी |
मुरुड तालुक्यातील राजपुरी ग्रामपंचायत हद्दीतील खोरा बंदर अंतर्गत प्रवासी जेट्टीचे काम पूर्ण झाले आहे. ही जेट्टी जंजिरा किल्ल्यात जाणाऱ्या पर्यटकांसाठी बांधली असून अद्याप त्याचे उद्घाटन झालेले नाही. तरी या जेट्टीच्या प्रवासी उतरण्याच्या पायरीचे स्लॅब फुटले असून ते कधीही पडतील व अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच, मुख्य रस्त्यापासून खोरा बंदराकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्याची देखील अवघ्या सहा महिन्यांत दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे जंजिरा किल्ल्यात जाणाऱ्या पर्यटकांचा जीव धोक्यात घालण्यापेक्षा उद्घाटनाआधी जेट्टीची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
मुरुड तालुक्यातील राजापुरी येथील ऐतिहासीक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी दरवर्षी देशभरातून हजारोंच्या संख्येने पर्यटक याठिकाणी येत असतात. पावसाळ्यात हा किल्ला सर्वसामान्यांसाठी बंद ठेवला जातो. त्यामुळे या दिवसांत पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या व्यावसायिकांना फार मोठा तोटा सहन करावा लागतो. आता पावसाळा संपुष्टात आला असून काही दिवसांपूर्वी जंजिऱ्याचे दरवाजे सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले आहेत. असे असतानाही पर्यटकांसह स्थानिक व्यवसायीकांचा मोठा हिरमोड होताना दिसत आहे. पर्यटकांची संख्या वाढवावी व त्यांचा सुखाचा प्रवास व्हावा याकरिता शासनाने करोड रुपये खर्च करून मुरुड-खोरा बंदर येथील मुख्य रस्त्यापासून ते खोरा बंदर कार्यालयापर्यंत तसेच जेट्टी परिसरातील अंतर्गत रस्त्यांचे काम पूर्ण करुन घेतले आहे. परंतु, हा रस्ता ठेकदाराच्या निष्काळजीपणामुळे सहा महिन्यांच्या आतच उखडला गेला आहे. येथील अंतर्गत रस्त्यांमधुन सिमेंटचा भुसा व दगडे बाहेर येऊन रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या कामाची वस्तुस्थिती पाहता संबंधित ठेकेदाराने फक्त पैसे लाटण्याच्या उद्देशाने हे काम केलेल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झालेले असून एखादी दुचाकी जरी गेली तरी या रस्त्यावरचा सिमेंटचा भुसा उडून पादचारी पर्यटकांच्या नाका-तोंडात जात आहे. पाऊस पडत असताना तर या रस्त्याला अक्षरशः तळ्याचे स्वरूप येते.
त्यातच याठिकाणी नव्या जेट्टीची उभारणी करण्यात आली आहे. तिचे अद्याप उद्घाटन देखील झाले नसतानाही जेट्टीची दुरवस्था झालेली आहे. या जेट्टीच्या प्रवासी उतरण्याच्या पायरीचे स्लॅब फुटले असून ते कधीही पडतील व मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने या कामांसाठी खर्च केलेले करोडो रुपयांचा चुराडा झाल्याचे स्थानिकांमधून बोलले जात आहे. नुकतेच जंजिरा किल्ला सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला असून तुरळक प्रमाणात पर्यटक येण्याची सुरवात झाली आहे. परंतु, येथील परिस्थिती पाहता पर्यटक काढता पाय काढतील आणि स्थानिकांवर उपासमारीची वेळ येऊ शकते, अशी भिती व्यक्त केली जात आहे.
ठेकेदारासह अधिकाऱ्यांची मुजोरी
या रस्त्यावर टाकण्यात आलेले गतिरोधक अतिशय चुकीच्या पद्धतीने बनवण्यात आले आहेत. ते रूंदीला कमी असून उंचीला मोठे असल्याने त्यावरून जाणारी वाहने जोरात आपटतात. अनेक वाहनांना नुकसान देखील सहन करावे लागत असून अपघाताच्या घटना देखील घडत आहेत. याबाबत संबंधित प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. परंतु, मुजोर अधिकारी व ठेकेदार यांच्याकडून जाणिव पूर्वक दुर्लक्ष केले जात असल्यामुळे सर्वसामान्यांसह पर्यटकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे शाससनाच्या करोडो रुपयांचे नुकसान करणारा ठेकेदार व त्यांना सहकार्य करणाऱ्या मुजोर अधिकाऱ्यांची चौकशी करुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. तसेच, या ठेकेदराला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
खोरा बंदर जेट्टी कामात त्रुटी असल्याचे अनेकवेळा दाखवून देखील ठेकेदार काम पूर्ण करत नसल्याने त्याला नोटीस देण्यात अली आहे. रस्त्याचे काम पुन्हा नवीन टेंडर काढून लवकरच सुरु करण्यात येणार आहे. तसेच, जेट्टीच्या कामाचे परीक्षण झाल्याशिवाय पर्यटकांना जाण्यासाठी ती खुली होणार नाही.
– प्रमोद राऊळ, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड
