जनजागृती आदिवासी संस्थेची मागणी
। नेरळ । प्रतिनिधी ।
वरवणे येथील शासकीय आश्रमशाळेमधील चौथीमध्ये शिकत असलेल्या खुशबू नामदेव ठाकरे हिचा मृत्यू झाला. चुकीचा औषधोपचार केल्याने खुशबूचा मृत्यू झाला असून, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी जनजागृती आदिवासी विकास संस्थेने रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या संस्थेचे अध्यक्ष जैतू पारधी आणि सचिव गणेश पारधी यांनी हे निवेदन अलिबाग येथे जाऊन निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द केले असून, प्रसंगी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
खुशबूच्या मृत्यूनंतर आठ दिवसांनी आदिवासी विभागाला जाग आली आणि पेण पोलीस ठाण्यात तिच्या मृत्यूची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली. दुसरीकडे संबंधित मुलीला कुष्ठरोग निष्पन्न झाला आहे, याची माहिती शाळा प्रशासन, आदिवासी विकास प्रकल्प यांनी किमान 15 दिवस पालकांपासून लपवून ठेवली होती. नामदेव ठाकरे हे आपल्या मोठ्या मुलीला भेटण्यासाठी गेल्यावर धाकटी मुलगी खुशबू ही आजारी असल्याचे कळले होते. त्यामुळे आदिवासी विकास विभागाच्या हलगर्जीपणा दिसून येत असून, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, शासकीय आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आणि अधीक्षिका तसेच आरोग्य विभागाचे डॉक्टर यांची शासनाने उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी विनंती आहे. खुशबूचा मृत्यू हा चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेल्या औषधांमुळे झाला आहे. संबंधित दोषींवर कायदेशीर कारवाई झाली नाही, तर आम्ही आदिवासी समाज उपोषणाला बसू, असा इशारा देण्यात आला आहे. आम्हाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा सरकारकडून यावेळी व्यक्त केली.
दरम्यान, खुशबूच्या मृत्यूशी संबंधित शासकीय आश्रमशाळेचे मुख्याध्यापक तसेच त्या मुलीचे वडील नामदेव ठाकरे यांचे जबाब महिला पेण पोलीस उपनिरीक्षक यांनी नोंदवून घेतले आहेत. खुशबू शालेय मुलीचा 22 डिसेंबर रोजी मृत्यू झाला असून, संबंधित मुलीच्या मृत्यूचा पंचनामा पोलिसांना प्राप्त झाल्यावर पुढील कार्यवाही करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.







