निधीअभावी कामाला ब्रेक लागण्याची माहिती
| अलिबाग | प्रतिनिधी |
पक्षी शास्त्रज्ञ डॉ. सलीम अली यांच्या नावाचे किहीमध्ये पक्षी अभ्यास केंद्र उभारणीचा गाजावाजा जिल्हा परिषद व वन विभागामार्फत करण्यात आला. मात्र, साडेतीन वर्षे होऊनदेखील हा प्रकल्प अद्याप पूर्ण झाला नाही. निधीअभावी या प्रकल्पाच्या कामाला ब्रेक लागला आहे. त्यामुळे अलिबागसह संपूर्ण रायगडकारांचे स्वप्न अपूर्णच राहणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
अलिबाग तालुक्यातील किहीम येथील जिल्हा परिषदेची शाळा 2007 पासून बंद होती. या ठिकाणी डॉ. सलीम अली यांच्या नावाचे पक्षी अभ्यास व संशोधन केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. रायगड जिल्हा परिषद व वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रकल्पाची उभारणी करण्याच्या हालचाली सुरू झाली. जिल्हा परिषद शिक्षण विभागाची परवानगी घेऊन 11 जानेवारी 2022मध्ये या प्रकल्पाच्या कामाचा भूमीपूजन सोहळा मोठ्या थाटामाटात झाला. तत्कालीन पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते या प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ झाला. एक वर्षात हा प्रकल्प उभा राहण्याची अपेक्षा होती. या प्रकल्पासाठी जिल्हा नियोजन समितीकडून 55 लाख प्रादेशिक पर्यटनातून एक कोटी 20 लाख असा एकूण एक कोटी 70 लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. ‘नव्याचे नऊ दिवस’ या उक्तीप्रमाणे प्रकल्पाचे काम सुरू झाले. यासाठी 50 लाख रुपये खर्च करण्यात आले. मात्र, तीन वर्षे सहा महिने होऊनदेखील या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले नाही. निधी नसल्याने या प्रकल्पाचे काम रखडले आहे, असे संबंधित विभागाकडून सांगण्यात येते. याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल देवांग यांच्याशी संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही.
डॉ. सलीम अली हे पक्षी अभ्यासक होते. किहीम येथे राहात असताना त्यांनी अनेक पक्ष्यांचा अभ्यास केला आहे. त्यामुळे सलीम अली यांच्या नावाचे पक्षी अभ्यास केंद्र बांधण्याची संकल्पना उदयास आली. पर्यटनवाढीला चालना देणे, वेगवेगळ्या पक्ष्यांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या प्रकल्पातून करण्यात आला आहे. डिजिटल माहिती केंद्र, पक्ष्याविषयी लिहिलेल्या पुस्तकांचे ग्रंथालय या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. परंतु, शासनाकडून निधी प्राप्त झाला नाही. त्यामुळे हा प्रकल्प अपूर्णावस्थेत राहिला आहे.
डॉ. सलीम अली पक्षी अभ्यासकेंद्राच्या कामासाठी प्रादेशिक पर्यटनातून एक कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला होता. आतापर्यंत 50 लाख रुपये या कामासाठी खर्च झाले आहेत. जास्तीच्या निधीची तरतूद नसल्याने हे काम थांबले आहे. निधी प्राप्त झाल्यास कामाला सुरुवात केली जाईल.
बांधकाम अधिकारी, जि.प.