डोके जमिनीवर आपटून बालिकेची हत्या

आरएएफचा जवान अटकेत
| पनवेल | वार्ताहर |
तळोजा येथील रॅपिड अ‍ॅॅक्शन फोर्समधील एका जवानाने कौटुंबिक वादातून पत्नीसोबत झालेल्या भांडणातून आपल्या 3 वर्षीय मुलीला डोक्यावर आपटुन, तिच्या पोटामध्ये ठोसे मारुन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या नराधम पिता इतक्यावरच थांबला नाही, तर त्याने आपल्या मुलीचा मृतदेह लुंगीत गुंडाळून डेब्रीजमध्ये टाकून तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा देखील प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे. परशुराम तिपन्ना (39) असे या आरएएफ जवानाचे नाव असून खारघर पोलिसांनी त्याच्या विरोधात हत्या व पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.

तिपन्ना हा मुळचा कर्नाटक राज्यातील असून तो तळोजा येथील रॅपिड अ‍ॅक्शन फोर्समध्ये कार्यरत आहे. तसेच तो खारघर मधील पापडीचा पाडा गाव येथील चैतन्य सोसायटीत दुसरी पत्नी भाग्यश्री व 3 वर्षीय मुलगी मीनाक्षी यांच्यासोबत राहण्यास होता. परशुराम याची पहिली पत्नी गावी असल्याने त्याचे दुसरी पत्नी भाग्यश्री हिच्यासोबत नेहमी कौटुंबिक वादातून भांडण होत होते. सोमवारी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास परशुरामचे पत्नीं भाग्यश्रीसोबत कडाक्याचे भांडण झाले. या भांडणाच्या रागात आरोपी परशुराम याने पत्नी भाग्यश्री हिला बेदम मारहाण केली. तसेच त्याने रागाच्या भरात आपली 3 वर्षीय मुलगी मिनाक्षी हिला डोक्यावर आपटुन तिच्या पोटात ठोशा बुक्क्याने मारले.

त्यामुळे मुलगी मीनाक्षी मृत झाल्यानंतर हत्येचा हा प्रकार उघडकीस येऊ नये यासाठी आरोपी परशुराम याने आपल्या मुलीचा मृतदेह एका लुंगीत गुंडाळून तळोजा गावाजवळच्या मोकळ्या मैदानात डेब्रिजमध्ये टाकून त्यावर माती टाकून पुराव नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र दुस़र्‍या दिवशी सकाळी काही नागरिकांना लहान मुलीचा मृतदेह निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती खारघर पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक शिरीष यादव यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेऊन मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला. तसेच सदरचा मृतदेह पनवेल येथील उप जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. त्यानंतर पोलिसांनी हत्या करण्यात आलेल्या मुलीची ओळख पटविण्यासाठी पापडीचा पाडा गावात शोधा-शोध सुरु केली असता, मृत मुलगी ही चैतन्य सोसायटीतील रॅपीड ऍक्शन फोर्समधील जवानाची मुलगी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानुसार पोलिसांचे पथक सदर इमारतीजवळ गेले असताना, आरोपी परशुराम तिपन्ना हा गणवेशात पळून जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आला. त्यामुळे पोलिसांनी पाठलाग करुन त्याला पकडून त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी त्याला विश्‍वासात घेऊन त्याची अधिक चौकशी केली असता, पत्नीसोबत झालेल्या भांडणाच्या रागातून त्याने मुलीची डोके आपटून तिची हत्या केल्याचे तसेच तिच्या मृतदहाची विल्हेवाट लावण्यासाठी तिचा मृतदेह लुंगीत गुंडाळुन तो डेब्रिजमध्ये टाकुन दिल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Exit mobile version