बेकरे गावातील हातभट्ट्या उद्ध्वस्त

पोलिसांची धडक कारवाई

| कर्जत | प्रतिनिधी |

तालुक्यातील बेकरे गावात अवैध हातभट्टी गावठी दारूवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून धडक कारवाई करण्यात आली. यामध्ये 3 लाख 10 हजारांची रसायनमिश्रित दारू व लागणारे साहित्य पोलिसांनी नष्ट करीत सहा जणांवर गुन्हेदेखील दाखल केले आहेत. दरम्यान, पोलिसांच्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शनिवार, 12 ऑगस्ट रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजयकुमार सूर्यवंशी यांच्या सूचनेनुसार कर्जत तालुक्यातील बेकरे गावात अवैध हातभट्टीची गावठी दारू तयार होत असल्याची माहिती मिळाली होती. यामुळे रायगड अलिबाग येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक रविकिरण कोले यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल पोलीस निरीक्षक उत्तम आव्हाड व ग्रामीण पोलीस भरारी पथक 2 तयार करण्यात आले होते. दरम्यान, या भरारी पथकाने बेकरे गावात अचानक धाड टाकून जंगल परिसरात तयार करण्यात येत असलेली गावठी हातभट्टी दारू व दारू तयार करण्यासाठी लागणारे गुळ, नवसागरमिश्रित रसायन त्याचप्रमाणे लोखंडी ड्रम, प्लॅस्टिक ड्रम-कॅन, बॉयलर साहित्य असे एकूण तीन लाख दहा हजार किमतीचे साहित्य जागेवरच नष्ट करण्यात आले. तर, यावेळी सहा जणांवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

Exit mobile version