। नागोठणे । वार्ताहर ।
नागोठण्याची ग्रामदेवता श्री जोगेश्वरी मातेच्या प्रांगणात 17 व 18 मे, 2022 रोजी दुसर्या कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती चाळीसगाव वारकरी सांप्रदायाचे संस्थापक ह.भ.प. रायगड भूषण दळवी गुरुजी यांनी दिली.
या कीर्तन महोत्सवात ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीच्या 9 व्या व 12 व्या अध्यायाचे पारायण, अखंड हरीनाम तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कीर्तन महोत्सवाची सुरुवात मंगळवारी (दि.17) सकाळी नऊ वाजता मंगल पूजनाने होणार आहे. त्यानंतर दीप प्रज्वलन, मंगल पूजन, कलश पूजन, ध्वजारोहण, वीणा पूजन, श्री ज्ञानेश्वरी पूजन, नंतर श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाचन, सायंकाळी नागोठणे विभागातील चाळीसगाव वारकरी सांप्रदायाचे सामुदायिक हरिपाठ व रात्री 7 वाजता जळगाव येथील प्रसिद्ध कीर्तनकार खानदेश्वररत्न ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली जळकेकर यांचे कीर्तन व त्यानंतर हरी जागर होणार आहे. या कीर्तन महोत्सवाचा समारोप बुधवार दि. 18 मे रोजी सकाळी दहा वाजता वाणीभुषण, भिवंडी येथील ह.भ.प. जगन्नाथ महाराज पाटील यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार असल्याचे आयोजकांकडून करण्यात आले आहे.






