कपील पाटील यांच्या बैठकीकडे कथोरे समर्थकांची पाठ

| कल्याण | वृत्तसंस्था |

भिवंडी लोकसभेसाठी भाजपकडून केंद्रीय मंत्री कपील पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्याने त्यांनी मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकांना सुरूवात केली आहे. मुरबाड तालुक्यातील म्हसा रस्ता येथे सोमवारी आयोजित बैठकीला आमदार किसन कथोरे यांच्यासह भाजपचे बूथ प्रमुख, स्थानिक पदाधिकारी यांनी दांडी मारल्याने पाटील-कथोरे यांच्यामधील धुसफूस सुरूच राहणार असल्याची चिन्हे आहेत.

मागील अडीच वर्षापासून केंद्रीय मंत्री कपील पाटील आणि मुरबाडचे भाजप आमदार किसन कथोरे यांच्यात जोरदार धुसफूस सुरू आहे. गेल्या वर्षी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पुढाकार घेऊन आमदार कथोरे यांना शांत राहण्याचा सल्ला दिला होता. भाजप जिल्हा कार्यकारिणीत मंत्री कपील पाटील यांनी आपल्या समर्थकांची वर्णी लावून आमदार कथोरे समर्थकांची कोंडी केली. आमदार कथोरे यांच्या मुरबाड मतदारसंघात कार्यक्रम घेऊनही त्याला कथोरे यांना डावलण्याचे प्रयत्न पाटील समर्थकांनी केले, असे कथोरे समर्थक सांगतात. कथोरे हे कुणबी समजातील असल्याने मंत्री पाटील यांनी वेळोवेळी कुणबी विषयावर भाष्य करून कथोरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या प्रकाराने भिवंडी लोकसभा मतदारसंघातील मुरबाड, शहापूर, भिवंडी ग्रामीण, वाडा तालुक्यातील काही भागातील कुणबी समाज मंत्री पाटील यांच्यावर नाराज आहे.

भिवंडी लोकसभेसाठी आपणही प्रयत्नशील असल्याचे भाष्य केल्यानंतर पाटील यांनी कथोरे यांना लक्ष्य केले होते. हा राग आ. कथोरे आणि त्यांच्या समर्थकांमध्ये ठासून भरला आहे. भिवंडी लोकसभेची उमेदवारी घोषित झाल्यानंतर केंद्रीय मंत्री कपील पाटील यांनी आमदार कथोरे यांच्या बदलापूर येथील घरी जाऊन त्यांची भेट घेऊन सहकार्य करण्याची मागणी केली असली तरी, आ. कथोरे त्या मागणीला किती साद देतात हे मुरबाड म्हसा रोड येथील त्यांच्या आणि समर्थकांच्या अनुपस्थितीवरून स्पष्ट झाले आहे.

Exit mobile version