| अलिबाग | प्रतिनिधी |
नुकतेच स्पर्धा विश्व अकॅडमी या ठिकाणी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या रायगड जिल्ह्यातील युवक- युवतीसाठी प्रोत्साहनपर मार्गदर्शन व मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्वयंसिध्दा संस्था संचलित स्पर्धा विश्व अकॅडमी व प्रिझम सामाजिक विकास संस्था, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हाधिकारी किशन जावळे उपस्थित होते. तसेच महाराष्ट्राच्या गायिका अॅड. कलाताई पाटील, किरण करंदीकर, प्रिझम संस्थेच्या अध्यक्षा तथा राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी भारत सरकार तपस्वी नंदकुमार गोंधळी, स्पर्धा विश्व अकॅडमीच्या संचालिका तथा स्वयंसिद्धा संस्थेच्या अध्यक्षा सुचिता साळवी आदी मान्यवर व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
सर्वप्रथम जिल्हाधिकारी किसन जावळे यांचे स्वागत विश्व अकॅडमीच्या संचालिका तपस्वी गोंधळी, सुचिता साळवी तसेच महाराष्ट्रातील गायिका कला पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तपस्वी गोंधळी करीत असताना त्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याकरिता आपल्या परिसरामध्ये कशाप्रकारे अकॅडमीची स्थापना केली, या संदर्भात माहिती दिली.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी किशन जावळे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करताना वेळेचे उत्तम नियोजन केले पाहिजे, असे सांगितले. तसेच, सकारात्मक असणे गरजेचे आहे, चांगली संगत महत्त्वाची आहे, स्पर्धा परीक्षांबरोबर इतरही रोजगाराभिमुख व कौशल्यावर आधारित उपक्रम शिकून घेतले पाहिजेत. स्वप्न मोठी पहा, स्वप्न पूर्ण होत नाहीत. तोपर्यंत त्यांचा पाठपुरावा करणे याच्यातूनच यश प्राप्त होते, असेदेखील सांगितले.
पुढे त्यांनी सांगितले, डिटर्मिनेशन, कन्सिस्टन्सी ध्येय साध्य करताना फार महत्त्वाचे ठरतात. स्पर्धा परीक्षांबरोबरच आपला प्लॅन बी देखील तयार ठेवा. जेणेकरून अपयश आले, तर खचून न जाता आपण दुसऱ्या प्लॅनवर काम करून यशस्वी होऊ शकतो. आधुनिक युग हे AIचे युग आहे, त्यामुळे सोशल मीडियाचा माध्यमातून आपण बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी शिकू शकतो. मात्र, सोशल मीडियावर तासंतास आपला अनमोल वेळ वाया घालवून त्याच्या आहारी जाऊ नये.
किशन जावळे यांचे प्रोत्साहनपर मार्गदर्शन
