। पनवेल। वार्ताहर ।
कामोठे परिसरात दोन मुलींच्या वादात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या तरुणावर चाकू हल्ला झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या हल्ल्यात 19 वर्षीय तरुण जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्ष भगत (19) रा. उसर्ली खुर्द, पनवेल असे जखमी तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हर्ष हा नोकरी निमित्त कामोठेत त्याच्या मामाकडे राहत होता, त्याचे वडील कामोठे शहरात रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शुक्रवारी (दि. 19) हर्ष कामावर गेला होता, त्याच्या मित्राच्या सांगण्यानुसार हर्ष पुन्हा कामोठ्यातील त्याचा मित्र साहिल पाटील सोबत सेक्टर-36, कामोठे येथील ज्यूडिओ शॉपजवळ गेला. साहिलला त्याचा परिचयातील दोन मुलींच्या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी बोलावण्यात आले होते. घटनास्थळी पोहोचल्यावर या दोघीसोबत बोलत असताना त्यांच्या सोबत आलेल्या काही मुलांचा साहिलसोबत वाद सुरू झाला. तेव्हा हर्षने मध्यस्थी करत शांत राहण्यास सांगितले. मात्र, त्याच्यावरच शिवीगाळ व हातघाईला सुरुवात झाली. त्यातून झटापट वाढली आणि त्यातील स्वराज नावाच्या मुलाने चाकू काढून हर्षच्या पाठीवर वार केला. हल्ल्यानंतर एका मुलीने स्वराज जाऊ दे, चल असे म्हणून तेथून आरोपींना घेऊन पसार झाली. जखमी अवस्थेत हर्षला त्याचा मित्र साहिलने जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या प्रकरणी हर्ष भगत याने दिलेल्या तक्रारीवरून कामोठे पोलीस ठाण्यात स्वराज व त्याच्या साथिदारांविरोधात मारहाण व जीव घेण्या हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.







