| नाशिक | प्रतिनिधी |
मुंबईला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या तरुणांवर चाकू हल्ला झाल्याची घटना घडली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मराठवाडा येथील काही तरुण हे मुंबईला राज्यराणी एक्सप्रेसने अभिवादन करण्यासाठी जात असताना निफाड ते खेरवाडी दरम्यान काही अज्ञात चोरट्यांनी त्यांच्याकडील पैसे हिसकावून घेत त्यांच्यावर चाकू हल्ला केला व खेरवाडी रेल्वे स्थानकावर चैन पूलिंग करून पळ काढला. संतप्त नागरिकांनी रेल रोको करत जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत गाडी जाणार नाही अशी भूमिका घेतली. यामुळे राज्यराणी व सेवाग्राम एक्सप्रेस या दोन्ही गाड्या खेरवाडी स्थानकात खोळंम्बल्या आहेत. उद्या 6 डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. मुंबई येथील चैत्यभूमीवर देशभरातील लाखो अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येतात. मराठवाडा येथील काही तरुण आज राज्यराणी एक्सप्रेसने जात असतानाच निफाड ते खेरवाडी दरम्यान काही चोरट्यांनी त्यांच्याकडील पैसे हिसकावून घेतले. त्यांना विरोध केला असता त्यांनी या तरुणांवर चाकूने हल्ला केला. यात तरुण जखमी झाले आहेत.






