। प्रतीक कोळी। अलिबाग ।
भारताची आर्थिक राजधानी असलेली मुंबई म्हणजे स्वप्नांची मायानगरी. रोजगार, प्रतिष्ठा, प्रसिद्धी, शिक्षण अशा विविध कारणांसाठी गावठिकाणच्या लोकांचा ओढा हा शहराकडे असतो. शहर असो वा गाव, कर्त्यांचे आयुष्य हे धकाधकीचेच. आणि याच धकाधकीच्या आयुष्यात झालेली अनपेक्षित ओळख एका नवीन नात्याला जन्म देत असते.
दादर या ठिकाणी वाढलेला एक तरुण घरच्यांच्या, परिसरातील लोकांच्या नकारात्मक बोलण्याला, सातत्याने दिल्या जाणार्या टोमण्याला आणि कौटुंबिक खटक्यांना कंटाळतो. मनातील नैराश्य त्याला आत्मघाताला प्रवृत्त करते आणि अखेर तो रेल्वेखाली चिरडून मरण्याचा निर्णय घेतो.
या निर्णयाला मूर्तरुप देण्यासाठी तो रेल्वेस्थानकावर जातो आणि तिथे रेवदंडा या ग्रामीण भागातून रोजगारासाठी आलेली एक तरुणी त्याला वाचवते. ग्राम्यभाषेत त्याला नवीन दृष्टी देते आणि आपला हा मार्गदर्शक, आपला जोडीदार असावा, या विचाराने पुढचा-मागचा विचार न करता हा तरुण तिथेच त्या तरुणीला प्रेमाची गळ घालत, लग्नाची मागणी घालतो.
एखाद्या चित्रपट किंवा मालिकांसारखी वाटणारी ही कथा खर्या अर्थी घडली ती 1989-90 साली, मुंबईमधील विक्रोळी (पू.) रेल्वे स्थानकात. अर्थात, एकाकी मागणी आल्यानंतर धास्तावलेली ती तरुणी तिथून तडकाफडकी निघून गेली खरी; पण पुढे ही ‘प्रीत’ फुलली. घरच्यांचा, समाजाचा विरोध पत्करुन दोघेही विवाहबद्ध झाले आणि हे दाम्पत्य रेवंदडा, मोठा कोळीवाडा येथे स्थायिक झाले.
हे दाम्पत्य म्हणजे श्री व सौ शुभांगी विजय कोळी. आजघडीस त्यांच्या या संसाराला 30 वर्षे झाली असून, उभयतांनी संघर्ष करत आपल्या परीने संसार फुलवला. शुभांगी यांना माहेरचा मानसिक आधार मिळाला असला तरी, सुरुवातीस या दाम्पत्याने आपला संसार स्वतःच्या जीवावर उभा केला. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने त्यांनी दिलेला हा आठवणींना उजाळा.