पीएनपी पाष्टी हायस्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन
| म्हसळा | वार्ताहर |
प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीची माध्यमिक शाळा पाष्टी या शाळेत तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या अनुषंगाने शालेय विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात पार पडले. 21 व्या शतकात ज्ञानाला विज्ञान व तंत्रज्ञानाची जोड दिल्यास विद्यार्थ्यांची विज्ञाना प्रति आवड निर्माण होऊन त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होईल व देशाला विकसित करणारे सुजाण नागरिक घडवता येतील, असे प्रतिपादन उद्घाटनप्रसंगी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण यांनी केले.
विज्ञान प्रदर्शनात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन लहान-मोठ्या अशा एकूण 34 प्रतिकृती वर्णनांसह मांडल्या होत्या. शाळेचे मुख्याध्यापक सुदाम माळी यांच्या प्रेरणेने व शाळेचे विज्ञान शिक्षक विनयकुमार सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली व नियोजनाने-सामाजिक विकासासाठी विज्ञान या थीमखाली आयोजित विज्ञान प्रदर्शनाचा लाभ रा.जि.प शाळा पाष्टी, रा.जि.प. मांदाटणे येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतला.
सुंदर शालेय परिसर, विद्यार्थांचा उत्साह, प्रयोगाची मांडणी, प्रदर्शनातील विविधता व उपयुक्तता याबाबींवर भाष्य करताना केंद्रप्रमुख नरेश सावंत, किशोर मोहिते व रमेश जाधव यांनी पाष्टरी हायस्कूल नेहमीच उपक्रमात अग्रेसर असल्याचे सांगत शाळेतील शिक्षकांचे कौतुक केले. शाळेतील परसबागेतील भोपळे भेट देऊन उपस्थितांचे शालेय विज्ञान प्रदर्शन भेटीबद्दल शाळेचे मुख्याध्यापक सुदाम माळी यांनी आभार मानले. 0 पाष्टी हायस्कूलमध्ये संपन्न झालेल्या शालेय विज्ञान प्रदर्शनाला म्हसळा तालुका गटशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण, पाष्टी केंद्राचे केंद्रप्रमुख नरेश सावेत, मेंदडी केंद्रप्रमुख किशोर मोहिते, आदर्श शिक्षक रमेश जाधव, सरपंच चंद्रकांत पवार, शाळा अध्यक्ष राजाराम धुमाळ, गाव अध्यक्ष राजाराम दिवेकर, शा.व्य.स.अ. सुनील भोजने, जगजीवन माड, शांताराम कांबळे व पंचक्रोशीतील पालक, राजिप शाळा मांदाटणे, राजिप शाळा पाष्टी येथील विद्यार्थ्यांनी भेटी व शुभेच्छा दिल्या.







