। श्रीवर्धन । वार्ताहर ।
हल्लीच्या काळात सायबर लॉचे ज्ञान आवश्यक झाले आहे. म्हणूनच समजेल तेवढाच मोबाईलचा वापर करावा, असे उद्गार श्रीवर्धनचे न्यायाधीश ए.एस. साटोटे यांनी काढले आहेत. श्रीवर्धन न्यायालयात बुधवारी (दि.23) ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित केलेल्या कायदेविषयक शिबिरात ते बोलत होते. तसेच, ज्येष्ठ नागरिकांना संरक्षण देण्यासाठी कायदा बनवावा लागतो ही शोकांतिका आहे, असेही ते आपल्या मार्गदर्शनात म्हणाले. या शिबिरामध्ये अॅड. संतोष सापते यांनी सायबर सिक्युरिटीबद्दल मार्गदर्शन करताना सायबर गुन्ह्यांची वेगवेगळी उदाहरणे सांगून मोबाईलचा वापर अतिशय सावधपणे करणे आवश्यक आहे, असे निदर्शनास आणले. यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. इसाने, अॅड. वढावकर, अॅड.वावेकर, अॅड. ठोसर, अॅड. लाड व अन्य वकील वर्गही उपस्थित होते.