| मुंबई | प्रतिनिधी |
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे पावसाळी अधिवेशना दरम्यान विधिमंडळाचे कामकाज सुरू असताना रमी खेळत असतानाचा कथित व्हिडिओ बाहेर आल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. मात्र, कोकाटेंचा राजीनामा न घेता त्यांचा कृषीमंत्रीपदावरुन उचलबांगडी करण्यात आली आहे. रमी खेळणे त्यांच्या अंगलट आले असून, मंत्री दत्ता भरणे यांच्याकडे कृषीमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मंत्रालयाच्या सामान्य प्रशासन विभागाने गुरुवारी रात्रीच या बदलाची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी माणिकराव कोकाटे यांना आपल्या भेटीसाठी बोलवून कडक शब्दांत तंबी दिली होती. परंतु, सहकाऱ्यांच्या आग्रहास्तव त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घेतला नव्हता. मात्र, खातेबदलाची शिक्षा त्यांना दिली आहे. सभागृहाच्या कामकाजातही देहभान हरपून रमी खेळणाऱ्या कोकाटेंकडे रात्री उशिरा क्रीडा खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
कोकाटे यांच्याकडून काढून घेतलेल्या कृषी खात्याची जबाबदारी अजित पवार यांचे विश्वासू समजले जाणारे दत्ता भरणे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. माणिकराव कोकाटे यांच्याकडे क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दरम्यान, मी रमी खेळलो नाही, दोषी आढळलो तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देईन, अशी प्रतिक्रिया माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे.






