कोकाटेंना कोणत्याही क्षणी होणार अटक; शासकीय सदनिका लाटणं भोवलं

| मुंबई | प्रतिनिधी |

शासकीय सदनिकेसाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याबद्दल कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावलेले मंत्री माणिकराव कोकाटे यांनी अखेर राजीनामा दिला आहे. न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्याकडून क्रीडा आणि अल्पसंख्याक विकास ही दोन्ही खाती बुधवारी रात्री काढून घेण्यात आली होती. त्यानंतर कोकाटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राजीनामा दिला आहे. अजित पवार यांनी याबाबत माहिती देत कोकाटे यांचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवला असल्याचे सांगितले. माणिकराव सध्या लीलावती रुग्णायात उपचार घेत आहे. त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. त्यांना अटक करण्यासाठी नाशिक पोलीस मुंबईकडे रवाना झाले असून, कोणत्याही क्षणी कोकाटेंना अटक होऊ शकते.

बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका लाटल्याच्या प्रकरणात ॲड. माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा सत्र न्यायालयाने कायम ठेवल्याने त्यांचे मंत्रीपद धोक्यात आले होते. त्यानंतर बुधवारी रात्री माणिकराव कोकाटे यांच्याकडील क्रीडा व अल्पसंख्याक विकास ही दोन्ही खाती उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे सोपविण्यात आल्याचा आदेश राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी जारी केला. विरोधकांकडूनही कोकाटे यांच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी केली जात होती. अशातच अजित पवार यांनी एक्स पोस्ट करुन माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिल्याचे जाहीर केले. तसेच कायदेशीर प्रक्रियेवर आमचा ठाम विश्वास असल्याचेही अजित पवार म्हणाले.

माननीय न्यायालयाच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सदस्य व पक्षातील आमचे सहकारी माणिकराव कोकाटे यांनी आपला राजीनामा माझ्याकडे सुपूर्द केला आहे. कायदे-नियम हे सर्वोच्च स्थानी असून, ते कोणत्याही व्यक्तीपेक्षा सर्वोतोपरी आहेत, या आमच्या पक्षाच्या दीर्घकालीन भूमिकेनुसार हा राजीनामा तत्त्वतः स्वीकारण्यात आला आहे. संवैधानिक प्रक्रियेनुसार पुढील कार्यवाहीसाठी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मुख्यमंत्री महोदयांकडे पाठवण्यात आला आहे, असं अजित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं.

माणिकरावांना कोणत्याही क्षणी अटक होणार?
दरम्यान, माणिकराव कोकाटे यांना आता कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. कारण, कोकाटे यांच्याविरोधात बुधवारीच अटक वॉरंट जारी झालं आहे. नाशिक पोलिसांचं एक पथक कोकाटे यांच्या अटकेसाठी मुंबईच्या दिशेला रवाना झालं आहे. माणिकराव कोकाटे सध्या आजारी आहेत. त्यांच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यामुळे नाशिक पोलीस मुंबईत येऊन आधी कोकाटे यांची भेट घेऊ शकतात. कोकाटेंची प्रकृती बघून पोलीस त्यांना अटकेचा निर्णय घेतात का? ते पाहणं महत्त्वाचं आहे.
काय आहे प्रकरण?
सुमारे 30 वर्षांपूर्वी माणिकराव कोकाटे यांनी नाशिक शहरात अल्प उत्पन्न गटातून सदनिका मिळवली होती. त्यांनी स्वतःसह भाऊ विजय कोकाटे, पोपट सोनवणे आणि प्रशांत गोवर्धने या चार जणांनी कॅनडा कॉर्नर भागात निर्माण व्ह्यू अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून अल्प उत्पन्न गटासाठीच्या सदनिका प्राप्त केल्या. तत्कालीन दिवंगत राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली. जिल्हा प्रशासनाने चौकशी केली. या प्रकरणी प्रथम वर्ग न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांच्यासह त्यांच्या भावाला प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास आणि 50 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली होती. या निर्णयाविरोधात त्यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली. मंगळवारी (दि. 17) जिल्हा न्यायालयाने माणिकराव कोकाटेंची दोन वर्षांची शिक्षा व दहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा कायम ठेवली आहे. तसेच न्यायालयाने त्यांच्या अटकेचे निर्देशही दिले आहेत.
अटकेत कायदेशीर अडथळा नाही
मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार, माणिकराव कोकाटे यांच्या अटकेत कोणताही कायदेशीर अडथळा नाही. नियमांनुसार, त्यांच्या अटकेसाठी विधिमंडळाच्या कोणत्याही परवानगीची आवश्यकता नाही. मात्र, कोकाटे यांना अटक केल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून विधिमंडळाला रीतसर कळवण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला राजीनामा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा स्वीकारला असून, पुढील कार्यवाहीसाठी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे पाठवला असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.
गुन्हे शाखेचे पथक ॲक्शन मोडमध्ये
कोकाटे यांच्या नावाचे अटक वॉरंट घेऊन नाशिक गुन्हे शाखेचे एक विशेष पथक मुंबईत दाखल झाले आहे. हे पथक सध्या सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या दालनात पोहोचले आहे. कोकाटे यांना ताब्यात घेताना त्यांच्या प्रकृतीचे काराण असेल तर रुग्णालयातील रूमबाहेरच पोलीस गार्ड तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Exit mobile version