| अलिबाग | प्रतिनिधी |
कोलाडजवळील तिसे येथील रेल्वे येथे गेटमन चंद्रकांत सटू कांबळे याची गोळी घालून हत्या केली. या गुन्ह्याचा तपास करून पंधरा दिवसात रायगड पोलिसांनी मारेकऱ्याचा शोध लावला. बहिणीच्या नवऱ्याने घराच्या विक्रीवरून सुरू असलेल्या वादामुळे हत्या केल्याचे पोलीसांनी उघड केले असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.
चंद्रकांत कांबळे हा इसम रेल्वेमध्ये काम करीत असताना, 21 ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास एका दुचाकीवर येऊन अज्ञाताने गोळीबार करून कांबळे यांची हत्या केली. गुन्ह्यातील मारेकऱ्याचा शोध घेण्यासाठी पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली आठ पथके तयार करण्यात आली होती.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह स्थानिक पोलिसांची मदत घेत मारेकऱ्यांचा शोध सुरु केला. तपास करीत असताना, मयत चंद्रकांत कांबळे यांची बहीण विमल शेट्टी व तिचा पती विजय शेट्टी यांच्यात घर विक्रीवरून वाद सुरू असल्याची माहिती समोर आली. त्याच्या घरी जाऊन तपासणी केली, त्यावेळी त्याच्या घरात बनावट नंबर प्लेट, जागेचा नकाशा अशा काही वस्तू सापडल्याने पोलिसांचा संशय बळावला.
पोलिसांनी त्याची पार्श्वभूमी तपासली असता आरोपीने यापुर्वीही जागेच्या वादारून पनवेलमध्ये गोळीबार करून दुहेरी हत्या केल्याची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात असल्याचे समोर आले. याशिवाय त्याने पुण्यात मालमत्ता अपहार केल्याचा गुन्हा दाखल असल्याचेही उघड झाले. या मारेकऱ्याचा शोध घेण्यासाठी चार पथके तयार करण्यात आली आहेत.
घराच्या वादावरून खून केल्याचा दावा
मयत चंद्रकांत कांबळे यांची बहीण विमल शेट्टी हिचे व तिचे पती विजय शेट्टी यांच्यात वाद असून दोघांचे संयुक्त नावाने असलेले खैरवाडी येथील घर विजय शेट्टी याला विकायचे होते. त्यावरून हा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले.