कोलाड रेल्वे स्टेशनचे नामकरण करण्यात यावे

वरसगांव ग्रामस्थांची मागणी

| कोलाड | वार्ताहर |

रोहा तालुक्यातील कोकण रेल्वेवर असणार्‍या कोलाड रेल्वे स्टेशनला ‘वरसगांव ‘ रेल्वे स्टेशन असे नाव देण्यात यावे, तसेच या कोकण रेल्वे मार्गांवर विरार ते पनवेल लोकल रेल्वे सुरु करावी अशी मागणी वरसगांव ग्रामस्थ यांच्या कडून केली जात आहे.

कोकण रेल्वे वरील वरसगांव हद्दीत असणार्‍या रेल्वे स्टेशनला कोलाड रेल्वे स्टेशन असे नाव देण्यात आले आहे. परंतु हा रेल्वे स्टेशन पूर्णपणे वरसगांव हद्दीत असुन या रेल्वे स्टेशनच्या परिसरातील 80 एकर जमीन ही वरसगांव येथील शेतकर्‍यांची कोकण रेल्वेसाठी संपादित करण्यात आली आहे या हद्दीत कोलाडचा कोणताही संबंध नसून या परिसरातील सर्व भाग वरसगांव हद्दीत मोडत असल्यामुळे या परिसरातील कोलाड रेल्वे स्टेशनचे वरसगांव रेल्वे स्टेशन असे नामकरण करावे. अशी मागणी वरसगांव ग्रामपंचायतीचे तंटामुक्ती अध्यक्ष आबा शिंदे, माजी सरपंच तुकाराम सानप, एकनाथ बागुल, भरत शिंदे तसेच असंख्य वरसगांव ग्रामस्थांकडून केली जात आहे.

कोकण रेल्वेमुळे कोकणचा विकास होईल तसेच मुंबई ठाणे येथे ये जा करुन तरुणांना रोजगार मिळेल व रायगड मधील विविध पर्यटन स्थळे यांना चालना मिळेल यासाठी कोकण रेल्वे मार्ग महत्वाचे ठरेल. यामुळे रायगड मधील शेतकर्‍यांच्या शेतजमिनी कवडी मोलाच्या भावाने संपादीत करण्यात आल्या. नंतर कोकण रेल्वे सुरु करण्यात आली. तसेच रोहा ते दिवा लोकल रेल्वे सुरु करण्यात आली परंतु याचा फायदा फक्त रोहा पर्यंत लोकांना झाला आहे. कोलाड, इंदापूर, माणगाव, महाड तसेच श्रीवर्धन, म्हसळा या परिसरातील लोकांना याचा फायदा अद्याप ही झालेला नाही. कारण या मार्गावरुन जाणारी फक्त रत्नागिरी पॅन्सेंजर ही एकमेव रेल्वे गाडी दिवसातून एक वेळा थांबते. याशिवाय अद्याप या मार्गावर कोणतीही लोकल रेल्वे सुरु केली नाही. त्यामुळे या परिसरातील लोकांना याचा फायदा काय? अशी संतप्त प्रतिक्रिया या परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. यामुळे या परिसरातील कोलाड रेल्वे स्टेशनचे वरसगांव रेल्वे स्टेशन असे नामकरण करावे व या रेल्वे मार्गांवरून विरार ते पनवेल अशी लोकल रेल्वे सुरु करावी अशी मागणी केली जात आहे.

Exit mobile version