अपघात झाल्यानंतरच खड्डे बुजवणार का?, नागरिकांचा संतप्त सवाल
। सुतारवाडी । प्रतिनिधी ।
कोलाडपासून सुतारवाडी या दहा किमी अंतरावर अत्यंत रहदारीच्या रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडले आहेत. हे खड्डे जून महिन्यापासून उग्ररूप धारण करत आहेत. या खड्ड्यांचा व्यास दिवसेंदिवस वाढत चाललेला दिसत आहे. भिरा फाट्यापासून सुतारवाडीपर्यंत अनेक खड्ड्यांनी रस्त्याला घेराव घातलेला दिसत आहे. भिरा फाटा सुरू झाला की खऱ्या अर्थाने खड्डेमय प्रवासाला सुरुवात होते. खड्डे चुकविताना वाहने एकमेकांवर आदळण्याची दाट शक्यता आहे.
भिरा फाट्याजवळ गतिरोधक आहे. या गतिरोधकाजवळच मोठा खड्डा पडलेला आहे. त्याचप्रमाणे तेथून पुढे गेल्यावर रस्त्यावरील एका बाजूची डांबर व खडी वाहून गेली आहे. त्यामुळे तेथे एक बाजूला रस्ता तर एक बाजूला मोकळी जागा अशी अवस्था झालेली आहे. वाळंजवाडीचा चढ सुरू झाला की रस्त्याच्या मधोमध आणि साईडला पडलेले खड्डे आपली भूमिका चोखपणे बजावत आहेत. काही दिवसांपूर्वी वाळजवाडी येथील वळणावर जीवघेणी साईडपट्टी तयार झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. वृत्त प्रसिद्ध होताच त्या ठिकाणी मोठी खडी टाकली गेली. मात्र, ती खडी पसरवण्याचे धाडस केले गेले नाही. तेथील खडीचा डोंगर जणू निवडणुकीची वाट पाहत असल्याचे दिसत आहे. वाळजवाडी रस्त्यावरील अनेक नागमोडी रस्त्यावरील साईटपट्ट्यांची अक्षरशः दुरावस्था झालेली आहे. त्या ठिकाणी केव्हाही मोठा अपघात होऊ शकतो. म्हणजे अपघात झाल्यानंतरच खड्डे बुजवण्याचे धाडस दाखवतील काय? असा प्रश्न आता हजारो प्रवाशांना पडलेला आहे.
सुतारवाडी नाक्यावर तर रस्त्याच्या बाजूला आणि मधोमध खड्डे पडलेले आहेत. किमान गणपतीपूर्वी जागोजागी पडलेले खड्डे बुजविले जातील, अशी अपेक्षा हजारो प्रवाशांची होती. मात्र, ती अपेक्षा फोल ठरली आहे. रात्रंदिवस या ठिकाणाहून हजारो लहान मोठी वाहने त्याचप्रमाणे अवजड सामान घेऊन जाणारे ट्रेलर धावत असतात. हा रस्ता सुस्थितीत होणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र, याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे प्रवाशांच्या निदर्शनास आले आहे.
आता लवकरच दिवाळी सण सुरू होईल. दिवाळी सणापूर्वी तरी कोलाड ते सुतारवाडी मार्गावरील पडलेले खड्डे बुजविले जातील का?, असा प्रश्न हजारो प्रवाशांना पडलेला आहे.
