| कोलाड | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील खांब-कोलाड परिसरात महावितरण कंपनीकडून वारंवार वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. त्यामुळे या परिसरातील व्यावसायिकांसहित नागरिक कमालीचे हैराण झाले आहेत. त्यामुळे महावितरण कंपनीच्या मनमानी कारभारावर मोठी संतापाची लाट उसळली आहे.
कोकणात गौरी-गणपती उत्सव हा मोठ्या उत्सहात साजरा केला जातो. या उत्सवाला 15 दिवस शिल्लक असल्यामुळे या परिसरात रंगरंगोटी, डेकोरेशन यासाठी नागरिक कामाला लागले आहेत. परंतु, वारंवार विद्युत पुरवठा बंद होत असल्यामुळे नागरिकांच्या अडचणीत वाढ होतांना दिसत आहे. तसेच, शासकीय आणि निमशासकीय कार्यालये, बँका, झेरॉक्स सेंटर, ई सेवा केंद्र व घरगुती ग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोलाड परिसरातील महावितरणच्या हलगर्जीपणामुळे सर्व सामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. वीज पुरवठ्यातील या अनियमिततेमुळे अनेक ठिकाणी कामांमध्येही अडथळे निर्माण होत असल्याचा संताप नागरिकांकडून होत आहे. तसेच, वेळेवर वीजबिल भरण्यासाठी दबाव टाकणारे अधिकारी, वीज पुरवठ्याच्या समस्या सोडवण्यात अपयशी ठरल्याचा आरोप स्थानिक ग्राहक मंडळींकडून व्यक्त केला जात आहे.






