कोल्हापूर टस्कर्सचा दुसरा विजय

। गहुंजे । प्रतिनिधी ।

कर्णधार राहुल त्रिपाठी (63) याने केलेल्या अर्धशतकी खेळीसह श्रेयस चव्हाण (4/14) याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर कोल्हापूर टस्कर्स संघाने रत्नागिरी जेट्स संघाचा 2 धावांनी पराभव केला. कोल्हापूर टस्कर्सचा हा दुसरा विजय ठरला.

गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर सुरु झालेल्या या स्पर्धेत रत्नागिरी जेट्स संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रत्नागिरीच्या गोलंदाजांनी प्रभावी मारा करत कर्णधाराने घेतलेला निर्णय सार्थ ठरविला. हर्ष संघवी (1), अंकित बावणे (2) यांना झटपट बाद करून सलामीची जोडी लवकर तंबूत पाठवली. दिव्यांग हिंगणेकरने अंकित बावणेला, तर प्रदीप दाढेने हर्ष संघवीला झेल बाद केले. त्यानंतर कर्णधार राहुल व सिद्धार्थ यांनी तिसर्‍या विकेटसाठी 36 चेंडूत 50 धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला. पण याचवेळी कर्णधार अझीम काझीने राहुल त्रिपाठीला 63 धावांवर झेल बाद केले. पाठोपाठ सिद्धार्थ म्हात्रे धावबाद झाला. त्यानंतर योगेश डोंगरे (28), अनिकेत पोरवाल(10), श्रीकांत मुंढे (16) यांनी धावा काढून संघाला 20 षटकात 7 बाद 169 धावांचे आव्हान उभे केले.

170 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या रत्नागिरी जेट्स संघाला 20 षटकात 7 बाद 167 धावाच करता आल्या. कोल्हापूर टस्कर्सच्या श्रेयस चव्हाणने 14 धावात 4 गडी बाद करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याला श्रीकांत मुंढे (1/25), मनोज यादव(1/42)यांनी प्रत्येकी एक गडी बाद करून साथ दिली.

Exit mobile version